Take a fresh look at your lifestyle.

BLOG : “म्हणून आपण शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतोय..”; पहा पवार साहेबांनी नेमके काय म्हटलेय

आज वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. यापूर्वी अनेकदा माझा वाढदिवस साजरा झाला. मी पन्नास वर्षांचा झालो तेव्हा नागपूरला विदर्भातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा केला. मी ६१ वर्षांचा झालो तेव्हा श्री. भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये स्व. अटलजींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. ७५ वर्षांचा झालो तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि १५ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. साधारण तुम्ही लक्षात घेतलं तर ५०, ६१, ७५ या तीन टप्प्यावर वाढदिवसाचे कार्यक्रम झाले. पण ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे.

Advertisement

देशात, महाराष्ट्रात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिले आहे. १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे.  योगायोग म्हणजे आमच्या कुटुंबातील दोन-तीन सदस्यांचा याच दिवशी वाढदिवस असतो. तर पाठोपाठ १३ डिसेंबरला पत्नीचाही वाढदिवस येतो.  आज खऱ्या अर्थाने काही गोष्टींच्या संदर्भातीस निकाल आपल्याला घ्यावा लागेल. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य आहे. आज असंख्य प्रश्न देश आणि सामान्य लोकांसमोर आहेत. त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रभावी नीतीने काम करणारा पक्ष आणि कार्यकर्ता कोणता, हा प्रश्न समोर आला असता लोकांनी आपल्याच पक्षाचे नाव घ्यावे अशा पद्धतीने पक्षाची बांधणी करावी लागेल. मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. लोकांना भेटल्यानंतर मला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. अनेक ठिकाणी मी जातो. कधी मराठवाड्यात गेल्यानंतर औरंगाबादला संध्याकाळी उपेक्षित समाजातून पुढे आलेल्या तरुणांसोबत चर्चा करतो. त्यांना ऐकण्याची संधी मिळते.

Advertisement

अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीमध्ये विचार करणारे, लिहिणारे लोक फार मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत. ते सहजपणे बोलून जातात. कालच मी एक प्रसंग सांगितला. मला आठवतंय, मी एकदा संध्याकाळी औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमधील तरुणांशी संवाद साधत होतो. या महाविद्यालयात विशेषतः विदर्भातील दलित समाजाचे अनेक तरुण-तरुणी शिक्षण घेण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे महाविद्यालय काढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाबद्दल आस्था आणि आकर्षण वाटते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मी अनेकदा संवाद साधला. तिथे गेल्यानंतर अनेकांचे विचार ऐकायला मिळतात. त्यांच्या मनातली अस्वस्थता कळते. अन्याय-अत्याचाराबद्दल ते काय म्हणतात याची जाणीव होते. समाजकारण जर आपण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करू शकतो, याचा विचार करता येतो.

Advertisement

काल मी सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. कदाचित त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे. मोतीलाल बंजारा समाजातील विद्यार्थी होता. मोतीलालशी संवाद साधताना त्याने लिहिलेली कविता ऐकवली. कवितेचे नाव होते ‘पाथरवट’. पाथरवट म्हणजे छिन्नी हाती घेऊन हातोडीने दगड फोडणारे पाथरवट. या कवितेचे मर्म असे होते की, ज्या व्यक्तीच्या हातांनी दगडातून मूर्ती घडवली त्याच व्यक्तीला मंदिरात येऊ दिले जात नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे, अशी या कवितेमागची भावना होती. अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते. समाजातील उपेक्षित, वंचितांवर जे अन्याय झाले ते दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आज गरजेचे आहे. अशा कविता ऐकल्यावर जो अस्वस्थ होतो तो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे. पंधरा दिवसांपूर्वी मी विदर्भ दौरा केला. या भागातील आदिवासी लोक अनेक संकटांना तोंड देतात. नक्षलवादाचा त्रास आहे. यातून मार्ग काढून आज तेथील तरुण पिढी शिक्षित होण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. राजकीय विचारांबाबत त्यांच्याशी बोललो तर त्यांना राष्ट्रवादीचा विचार जवळचा वाटतो.  त्यांची एवढीच अपेक्षा आहे की, या जगात सन्मानाने जगण्याचा आमचा अधिकार आम्हाला द्या. माझे आग्रहाचे सांगणे आहे की, पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होतात. संधी मिळून काही लोक विधिमंडळ, लोकसभेत जातात.

Advertisement

पण त्यासोबत अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखात जो समरस झाला नाही तो खरा कार्यकर्ता नाही. म्हणून या घटकांशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आज समाजातील काही वर्गाला अद्यापही सन्मानाने जगण्याची संधी आहे, असे वाटत नाही. तसे वाटत नसेल तर ते दुरुस्त करण्याची काळजी आपण घेतली पाहीजे. आपल्यातले अनेक लोक सामान्यांना उभे करण्यासाठी काळजी घेत असतात. त्यामुळेच राष्ट्रवादीकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टीकोन वेगळा आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचे आपण नाव घेतो त्याचे कारण त्यांची विचारधारा आहे. त्यांची दृष्टी समाजाला पाच-पन्नास वर्ष पुढे नेणारी होती. त्यांच्या सूत्रावर आधारित काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ही भावना मनात ठेवून विचार केला पाहीजे. त्यासाठी वाचन केले पाहिजे, आपली वैचारिक बैठक मजबूत केली पाहिजे आणि त्यातून नवी पिढी तयार केली पाहिजे. हे सर्व आपण कराल, अशा अपेक्षा मी यानिमित्ताने व्यक्त करतो. *(फेसबुक पेजवरून साभार)

Advertisement

https://fb.watch/9RJsrVJJLH/

Advertisement
Advertisement

Leave a Reply