मुंबई : अलीकडेच चेन्नई सुपर किंग्ज संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. 2020 च्या सुरुवातीला, चेन्नईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ होता आणि पुढच्या वर्षी वर्षी म्हणजे २०२१ मध्ये शानदार पुनरागमन करत या संघाने ट्रॉफी जिंकली आहे.
चेन्नईने आयपीएल जिंकल्यानंतर टीमचे मालक श्रीनिवासन ट्रॉफीसह भगवान वेंकटचलपती मंदिरात गेले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाताचा 27 धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर धोनीला कायम ठेवण्याच्या प्रश्नावर श्रीनिवासन म्हणाले की, नवे नियम अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे धोनी आणि उर्वरित खेळाडूंना कायम ठेवण्याचा अंतिम निर्णय ते नियम समोर आल्यानंतरच घेतला जाईल.
एन. श्रीनिवासन म्हणले की, धोनी सीएसके, चेन्नई आणि तामिळनाडूचा अविभाज्य भाग आहे. चेन्नई सुपर किंग्ज धोनीशिवाय काहीच नाही आणि धोनी चेन्नई सुपर किंग्जशिवाय काहीच नाही. त्यामुळे त्याला संघात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
दुसरीकडे, चेन्नई संघात तामिळनाडूच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीबद्दल ते म्हणाले की, तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये सहभागी झालेले 13 खेळाडू आयपीएलमध्ये खेळत आहेत किंवा भारतीय संघाचा भाग आहेत. मोठ्या संख्येने लोक तामिळनाडू प्रीमियर लीगचे सामने पाहत आहेत आणि कालांतराने ही संख्या वाढेल.
जेव्हा श्रीनिवासन यांना विचारण्यात आले की आयपीएलचा विजय कधी साजरा केला जाईल, तेव्हा ते म्हणाले, टी -20 विश्वचषकात भारतीय संघाच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावल्यानंतर धोनी चेन्नईला येईल. नंतर एक कार्यक्रम आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचीही भेट घेणार आहेत.