दिल्ली : अयोध्येतील जमीन खरेदीमध्ये फ़क़्त 11 मिनिटात झालेला 18.5 कोटी रुपयांचा घोळ सध्या जगभरात चर्चेत आहे. हिंदू समाजाच्या भावनांना हात घालून गोळा केलेल्या पैशांद्वारे कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते तथा माजी मंत्री पवन पांडेय यांनी केला होता. त्यानंतर आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये घमासान सुरू झालेले आहे.
दोन कोटी रुपये मूल्याची जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून १८.५ कोटी रुपयांत खरेदी केल्याच्या वादासंदर्भात उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनेही अहवाल मागवला आहे. सोमवारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेण्यात आली आहे. तसेच ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास यांचे वारसदार कमलनयन दास यांनीही या प्रकरणात आवाज उठवला आहे. एक वर्षापासून ट्रस्टमध्ये जे काही होत आहे त्याची माहिती कधीच अध्यक्षांना दिली गेली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ट्रस्टकडे जनतेकडून दान मिळालेली ४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम आहे. त्यातून अयोध्येतील जमिनीवर मंदिर बांधले जाणार आहे. मात्र, त्यासाठी जमीन खरेदी करताना जास्त पैसे दिले जात असल्याचे काही कागदपत्रे व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्व निर्णय महासचिव चंपत राय हेच घेत आहेत. अध्यक्षांना काहीच विचारले जात नाही, असा गंभीर आरोप कमलनयन दास यांनी केला आहे.
ट्रस्टमधील अनेक सदस्य विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांच्या भूमिकेवर नाराज असून हरीश पाठक-कुसुम पाठक अाणि सुलतान अन्सारी-रविमोहन तिवारी यांच्यात झालेल्या दोन्ही व्यवहारांत डॉ. मिश्रा हेच साक्षीदार आहेत. ट्रस्टमधील दोन सदस्यांनी यावर हरकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. एकूणच हिंदू धर्मियांच्या आस्थेचे ठिकाण बनलेल्या या मंदिराचा मुद्दा आता पुन्हा एकदा यानिमित्ताने चर्चेत आलेला आहे. त्यावर योगी सरकार कोणती भूमिका घेणार आणि तोडगा काढणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले आहे.
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.