Tomato Price : टोमॅटो पुन्हा बाजारात चर्चेत आला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी बाजारात चक्क शंभर रुपये किलो पेक्षा जास्त किमतीने विकला जाणारा टोमॅटो आता बाजारात एक रुपये किलोच्या खाली आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे.
राज्यात टोमॅटोची आवक बंपर वाढल्याने मंडईत त्याचा भाव गडगडला आहे. टोमॅटोची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा खर्चही निघत नाही. सोलापूरच्या अशाच एका शेतकऱ्याने संतप्त होऊन टोमॅटो रस्त्यावर फेकले.
मिळालेल्या माहितीनुसार, टोमॅटोच्या घसरलेल्या भावामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून निषेध केला. शेटफळ येथील माढा रोडवर टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे सुमारे अर्धा तास महामार्ग ठप्प झाला होता.
शेतकरी झाला हतबल!
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील शेतकरी हनुमंत जाधव आपल्या टोमॅटोची विक्री करण्यासाठी बाजारात पोहोचले होते. जेव्हा व्यापाऱ्यांनी हनुमंतच्या टोमॅटोची फक्त 40 पैसे प्रतिकिलो दराने बोली लावली तेव्हा तो थक्क झाला. हनुमंत जाधव हे सुमारे पाच टन टोमॅटो विक्रीसाठी बाजारात आले होते. तर टोमॅटो तोडणे, बाजारात आणणे आणि मजुरीसाठी किलोमागे दीड रुपये खर्च येतो. याशिवाय टोमॅटो लागवडीचा खर्च वेगळा आहे.
कष्टाला किंमत नसते…
अशा स्थितीत 25 किलो टोमॅटोच्या एका कॅरेटला केवळ 10 रुपये भाव दिल्याने बाजारातील व्यापाऱ्यांविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्याने सर्व टोमॅटो महामार्गावर फेकून दिले. पुढे अनेक शेतकरी या निदर्शनात सामील झाले. सर्वांनी घोषणाबाजी करत टोमॅटोच्या भावाबाबत संताप व्यक्त केला. लाखो रुपये खर्च करून आणि रात्रंदिवस काम करूनही आपल्या कष्टाला किंमत नसल्याचे असहाय शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हनुमंत जाधव म्हणाले, “मी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली आहे. यासाठी सुमारे अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. एका आठवड्यात सुमारे 1000 कॅरेट टोमॅटोचे उत्पादन होते. यामुळे मला आतापर्यंत फक्त 70 हजार रुपये मिळाले आहेत. नफा विसरून उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सरकारने टोमॅटोला 15 रुपये प्रतिकिलो हमी भाव द्यावा. आमच्याकडे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही.