कोलकाता : तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस येत्या काही दिवसांत देशभरातील अनेक राज्यांमध्ये आपले अस्तित्व वाढवण्याचा विचार करत आहे. गोवा, त्रिपुरा आणि मेघालयपर्यंत मर्यादित ठेवू इच्छित नाही.
अभिषेक बॅनर्जी म्हणाले, की “आम्ही मेघालय, गोवा आणि त्रिपुरामध्ये प्रवेश केला आहे, पण आम्ही या तीन राज्यांपुरते स्वतःला मर्यादित ठेवणार नाही. पक्ष वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक लढणार आहे. त्रिपुरा आणि मेघालयमध्ये पुढील वर्षी निवडणुका आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये निवडणूक लढणार आहोत. अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूलचे उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्यासह तृणमूलच्या इतर नेत्यांनी गुरुवारी एक रोड शोमध्ये भाग घेतला. सुब्रत मुखर्जी यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बालीगंगे विधानसभेच्या जागेसाठी 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे.
ते म्हणाले, की “आम्ही गोव्यात 26 जागांवर लढलो आणि 9% मते मिळवली. बंगालमध्ये भाजपला 9% मते मिळायला किती वर्षे लागली ?” बॅनर्जी म्हणाले, की “पक्षाने गोव्यात निवडणुकीच्या तीन महिने आधी प्रवेश केला होता. “2019 मध्ये पेट्रोलची किंमत 70 रुपये होती, ती आता ‘115’ झाली आहे. डिझेल जवळजवळ ’60 ते ‘100’ च्या वर पोहोचले आहे. जीवरक्षक औषधांच्या किमती तीन पट वाढल्या आहेत. औषधे आणि खाद्य तेलांचे भावही भरमसाठ वाढले आहेत. दुसरीकडे मात्र एक सिनेमा करमुक्त केला जातो, असे त्यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीप्रमाणेच तृणमूल काँग्रेसही आता अन्य राज्यांत निवडणूक लढत आहेत. याआधी झालेल्या 5 राज्यांच्या निवडणुकांत तृणमूलने गोव्यामध्ये उमेदवार दिले होते. तसेच आता आगामी काळात त्रिपुरा आणि मेघालय राज्यातील निवडणुका पक्ष लढणार आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीने पक्षाने विजय मिळवला तसे धोरण अन्य राज्यात राबवण्याचा पार्टीचा विचार आहे. भाजपला अन्य राज्यांतही आव्हान देण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेस करत आहे. मात्र, बंगालप्रमाणेच अन्य राज्यात राजकीय परिस्थिती नाही.