अहमदनगर – आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (State Transport) नगर विभागाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. यावेळी जिल्ह्यातील आगारांतून पंढरपूरसाठी (Pandharpur) 350 जादा बस (Extra Bus) सोडण्यात येणार आहेत. जादा वाहतूक 5 जुलैपासून सुरू होणार आहे. 14 जुलैपर्यंत ही जादा वाहतूक सुरू राहणार आहे. यावेळी विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पंढरपूरसाठी जवळपास 80 टक्के बस या विनावाहक असणार आहेत. म्हणजेच, या बसमध्ये वाहक (Conductor) राहणार नाही. प्रवाशांना एकदा तिकीट घेतले की बस थेट पंढरपूरमध्येच थांबणार असल्याचे याद्वारे स्पष्ट होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त १० जुलै रोजी पंढरपूर यात्रा आहे. राज्यभरातून येथे लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात. त्यांच्या सोयीसाठी महामंडळाकडून जादा वाहतुकीची व्यवस्था करण्यात येते. यंदा कोरोनाचे (Corona Virus) कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. महामंडळानेही जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार नगर विभागाच्या वतीने पंढरपूर वारीसाठी 350 विशेष बस सोडल्या जाणार आहेत. 5 जुलै ते 14 जुलै या कालावधीत जादा वाहतूक सुरू राहणार आहे.
पंढरपूर यात्रेमुळे महामंडळाला कोट्यवधीचे आर्थिक उत्पन्न मिळते. गेल्या दोन वर्षांत पंढरपूर यात्रा भरली नाही. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधीचे उत्पन्न बुडाले आहे. नगर विभागाला या यात्रेतून जवळपास एक कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या दोन वर्षांत नगर विभागाला दोन कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने राज्य शासनाने कोरोनाचे सर्व निर्बंध उठविले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे यंदा 10 जुलै रोजी पंढरपूर यात्रा होत आहे.
नगर विभागाने सध्या तरी 350 बसचे नियोजन केले आहे. तयारीसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. नगर शहरातील तारकपूर बसस्टँड (Tarakpur Busstand) आणि सोलापूर रोडवरील चांदणी चौक येथून पंढरपूरसाठी बस सोडण्यात येणार आहेत. माळीवाडा बसस्टँड येथून पंढरपूरसाठी बस सोडल्या जाणार नाहीत.
दरम्यान, ज्या गावातून एकाच वेळी ४४ जण पंढरपूरला जाण्यासाठी तयार असतील तर त्यांच्यासाठी स्वतंत्र बस देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. बस बूक केल्यास थेट गावातूनच जाण्या येण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विभागाने यंदा बस दुरुस्ती पथकही नियुक्त केले आहे. बस कुठे नादुरुस्त झाल्यास तत्काळ दुरुस्ती पथक तेथे हजर होणार आहे. अशा पद्धतीने नगर विभागाने यंदा आषाढी यात्रेचे नियोजन केल्याचे सांगण्यात आले.
आषाढी वारीसाठी महामंडळ सज्ज..! ‘या’ जिल्ह्यातून पंढरीला जाणार ‘इतक्या’ बस; जाणून घ्या..