Water Supply : जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. खरीप हंगामातील पेरण्यांही मोठ्या प्रमाणात होत आहेत. आगामी काळातही पाऊस (Rain) होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी राज्यात अजूनही काही ठिकाणी लोकांना टँकरने (Tanker) पाणीपुरवठा करावा लागत आहे. या ठिकाणी आजही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला या लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) करावा लागत आहे. आजमितीस राज्यातील तब्बल 20 गावे आणि 73 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना 12 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वच सरकारी टँकर सुरू आहेत.
यंदा देशभरात कडाक्याचा उन्हाळा होता. राज्यातही वेगळी परिस्थिती नव्हती. मात्र, तरीही या काळात पाण्याची फारशी टंचाई जाणवली नाही. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या फारशी नव्हती. जून महिन्यात तर मान्सूनने (Monsoon) पदार्पण केले. त्यामुळे आताही पाण्याची टंचाई फारशी जाणवत नाही. जून महिन्यात पंधरा दिवस पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या संकटात सापडल्या होत्या. या काळात फार पाऊस पडला नाही. त्यामुळे मूग आणि अन्य पिकांवर परिणाम झाला. आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही.
दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील टँकर आता बंद झाले आहेत. मात्र, नगर 9, सातारा 2 आणि सांगली जिल्ह्यात 1 टँकरद्वारे पाणीपुरवठा केली जात आहे. अन्य कोणत्याही जिल्ह्यात टँकर सुरू नाहीत. सध्या फक्त सरकारी टँकरद्वारेच पाणीपुरवठा सुरू आहे. खासगी टँकर बंद झाले आहेत. जून आणि जुलै महिन्यात पाऊस सुरू असतानाही टँकरची संख्या जास्त होती. नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. आता फक्त तीनच जिल्ह्यात टँकर सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाने अहवालात स्पष्ट केले आहे.