Maharashtra Politics: … तर भाजप आमदारास गोळ्या घालेन, एमव्हीएच्या पदाधिकाऱ्याची धमकी

Maharashtra Politics: राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यातच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

या व्हिडिओमध्ये भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जळगाव येथील राजकारण चांगलच तापलं आहे.

प्रकरण काय

एका कार्यक्रमात महाविकास आघाडीचे पदाधिकारी माजी सरपंच किसनराव जोर्वेकर व्यासपीठावर भाषण करत होते त्यावेळी व्यासपीठावर माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख देखील उपस्थित होते. त्यावेळी भाषण करताना किसनराव जोर्वेकर म्हणाले, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे, त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे. मी शपथ घेऊन सांगतो, मी तुला संपवून टाकेल, माझे वय 73 आहे. मला कॅन्सर आणि मधुमेह आहे. तू माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन. मला काहीच फरक पडत नाही. मला जास्त जगायचे नाही. असं किसनराव जोर्वेकर म्हणाले. 

तर दुसरीकडे या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देणे अत्यंत गंभीर प्रकार आहे. आमदारांना गोळ्या घालून भर रस्त्यात मारून टाकेल यापेक्षा गंभीर घटना कोणती असू शकत नाही असं गिरीश महाजन म्हणाले. पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, सार्वजनिक व्यासपीठावर बसून आमदारांना अशा प्रकारची धमकी देणे अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रकार आहे. मंगेश चव्हाण माझ्यासोबत असून आम्ही या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून  संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी  करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी बोलताना दिली. 

तसेच भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, हे लोक लोकसभा निवडणुकीतून आलेल्या अपयशातून हे सर्व बोलत आहेत. मी लोकांमध्ये राहणारा त्यांचा  समस्या सोडवणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे यांच्या या धमक्यानी मला काही फरक पडणार नाही असं ते म्हणाले.

Leave a Comment