मुंबई : जिओ लवकरच भारतात 5G नेटवर्क आणणार आहे. Jio पहिल्या टप्प्यात भारतातील 1000 शहरांमध्ये 5G नेटवर्क प्रदान करेल. कंपनी बऱ्याच काळापासून 5G चाचणी करत आहे. जिओचा दावा आहे, की त्यांचा 5G पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे. Jio कडून त्याच्या 5G नेटवर्कवर हेल्थकेअर आणि औद्योगिक ऑटोमेशनची चाचणी घेतली जात आहे. कंपनी 5G च्या जलद उपयोजनासाठी पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार करत आहे. त्या ठिकाणी फायबर आणि विजेची उपलब्धताही वाढ करण्यात येत आहे. जेणेकरून जेव्हा 5G रोलआउटची वेळ येईल तेव्हा त्यात कोणताही व्यत्यय किंवा उशीर होणार नाही.
जिओ 5G नेटवर्क प्रथम त्या भागात आणले जाईल जेथे डेटाचा जास्त वापर आहे. हीट मॅप, 3D नकाशे आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञान असे क्षेत्र आणि ग्राहकांना ओळखण्यासाठी कंपनीकडून वापरले जात आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 2021 च्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालांवरून हे उघड झाले आहे. जिओने ग्राहक आधारित 5G सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी अनेक संघ तयार केले आहेत. जे देशात तसेच अमेरिकेत तैनात आहेत, ते विविध प्रकारचे 5G सोल्यूशन्स विकसित करू शकतात. कंपनीचा विश्वास आहे, की हे संघ 5G सोल्यूशन्स तयार करतील जे तंत्रज्ञानात जगाच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा चांगले असतील. याशिवाय, कंपनीने युरोपमध्ये एक टेक्नॉलॉजी टीम देखील तयार केली आहे जी पुढे 5G साठी तयारी करेल.
रिलायन्स जिओचा ARPU (प्रति ग्राहक प्रति महिना सरासरी महसूल) देखील वाढला आहे. दरमहा प्रति ग्राहक एआरपीयू 151.6 रुपये झाला आहे. जिओ नेटवर्कवरील प्रत्येक ग्राहकाने दरमहा 18.4 जीबी डेटा वापरला आणि सुमारे 901 मिनिटे संवादासाठी वापरली.
Jio ने या तिमाहीत सुमारे 1 कोटी 20 लाख ग्राहक आपल्या नेटवर्कमध्ये जोडले. मात्र या तिमाहीत जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या 84 लाखांनी कमी झाली आहे. जिओची ग्राहक संख्या आता 42 कोटी 10 लाखांच्या जवळपास आहे. तर Jio Fiber ने 50 लाख ग्राहकांचा टप्पा पार केला आहे.