Reliance Jio : रिलायन्स जिओ यूजर्सची (Raliance Jio) संख्या वेगाने वाढत आहे. जर ग्राहकांची संख्या अशीच वाढत राहिली तर येत्या 3 वर्षात रिलायन्स जिओ वापरकर्त्यांची संख्या अमेरिका आणि रशियाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त असेल.
ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या अहवालात असे म्हटले आहे की 2026 पर्यंत रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 50 कोटीपर्यंत असू शकते. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार, सध्या अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी 65 लाख आणि रशियाची 14 कोटींपेक्षा जास्त आहे. म्हणजे दोन्ही देशांतील लोकसंख्येपेक्षा जास्त लोक जिओचे ग्राहक असतील.
आता जिओ वापरकर्त्यांची संख्या किती आहे?
सध्याच्या काळात रिलायन्स जिओचे एकूण ग्राहक 43 कोटी 30 लाख आहेत. ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनच्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, पुढील 3 वर्षांत Jio सुमारे 6 कोटी 70 लाख नवीन ग्राहक जोडू शकते. त्यानंतर त्यांची संख्या 50 कोटींवर पोहोचेल. या अहवालात असेही म्हटले आहे की, सध्या मोबाइलच्या दरात फारशी वाढ झालेली नाही. 5G जिओसाठी कमाईचे नवीन दरवाजे देखील उघडू शकते. ज्यामुळे कंपनीची वाढ चांगली होऊ शकते.
VI आणि Airtel ची स्थिती
ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनचा अहवाल Vodafone Idea आणि Airtel ला धक्का देऊ शकतो. या अहवालानुसार Vodafone-Idea ची स्थिती येत्या काही वर्षांत आणखी बिघडू शकते. VI चा बाजारातील हिस्सा 2026 पर्यंत सुमारे 5 टक्क्यांनी 17% पर्यंत खाली येऊ शकतो. महसुली वाटा 13 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. त्याचवेळी भारती एअरटेलचा बाजार हिस्सा सुमारे एक टक्क्यांनी वाढू शकतो. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की व्होडाफोन-आयडियाचे जे नुकसान होणार आहे, त्याचा थेट फायदा जिओला होणार आहे.