Cricket News : क्रिकेट (Cricket) हा अनिश्चिततेचा खेळ असल्याचं म्हटलं जातं. शेवटचा चेंडू टाकेपर्यंत येथे काहीही होऊ शकते. संघ 10 धावांवर देखील बाद होऊ शकतो आणि तोच संघ सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम देखील करू शकतो. आता थायलँड आणि फिलीपिन्स यांच्यातील सामना घ्या. या महिला आंतरराष्ट्रीय T20 मध्ये, एका संघाने 11.1 ओव्हर्स फलंदाजी केली आणि फक्त 9 धावा केल्या. प्रत्युत्तरात इतर संघाने एकही गडी न गमावता अवघ्या 4 चेंडूत 10 धावा करून दणदणीत विजय नोंदवला.
फिलिपिन्सचा संघ 9 धावांवर गारद
प्रथम फलंदाजी करताना फिलिपिन्सच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. संघाकडून 4 फलंदाजांनी 2-2 धावा केल्या, तर एक धाव अतिरिक्त होती. अशा प्रकारे स्कोअरबोर्डवर 9 धावांची नोंद झाली.
अतिशय सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना थायलँड क्रिकेट संघाने अॅलेक्स स्मिथच्या पहिल्याच ओव्हरमधील 4 चेंडूत सामना संपवला. कर्णधार नन्नपत कोंचारोएनकाईने 2 चेंडूंत नाबाद 3 धावा केल्या, तर नत्थाकन चँथमने 2 चेंडूंत एका चौकाराच्या मदतीने नाबाद 6 धावा केल्या. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये फिलिपिन्सने केलेल्या या 9 धावा सर्वात कमी धावा नाहीत.
सर्वात लाजिरवाणा रेकॉर्ड मालदीवच्या नावावर आहे
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम मालदीवच्या नावावर आहे. 2019 मध्ये मालदीवचा संघ बांगलादेश आणि रवांडा विरुद्ध 6 धावांवर बाद झाला होता. तर त्याच वर्षी नेपाळ विरुद्ध संघाचा डाव 8 धावांवर संपला. यानंतर तिसर्या क्रमांकावर फिलिपिन्स क्रिकेट संघ येतो, ज्याचा डाव ९ धावांवर आटोपला.
थायलंडचा अनोखा विश्वविक्रम, तिसऱ्यांदा घडला हा विक्रम
दुसरीकडे थायलंडने एका अनोख्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. त्याने अवघ्या 4 चेंडूत सामना जिंकला. चेंडूंच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरला. याआधी रवांडा आणि टांझानियानेही 4 चेंडूत सामना संपवला आहे. तिघांचाही संयुक्त विश्वविक्रम आहे.