Free Breakfast : राजकारण करायचे असेल किंवा सरकार टिकवायचे आणि चालवायचे असेल तर नागरिकांसाठी काही घोषणा आल्याच. कल्याणकारी तसेच मोफत योजनाही सुरू करणे आपल्या देशात नवीन नाही. त्यामुळे राजकारणी आणि सत्ताधारी अशा घोषणा करत असतात. आताही दक्षिणेतील तामिळनाडू (Tamil Nadu) या राज्याने विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना सुरू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी याबाबत घोषणा केली आहे. तसेही मोफत घोषणा करण्यात तामिळनाडू राज्य प्रसिद्ध आहेच.
तामिळनाडू सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना आज एक अद्भुत भेट दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (CM MK Stalin) यांनी राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नाश्ता योजना (Free Breakfast Scheme) सुरू केली. ही योजना सुरू केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी यावेळी सांगितले की, योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1.16 लाख विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता दिला जाईल. या योजनेचा आणखी विस्तार केला जाईल, अशी ग्वाही मी सर्वांना देत असून हे सरकारचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टॅलिन म्हणाले की, कोणत्याही गरीब आणि वंचित विद्यार्थ्याने अन्नाच्या गरजेसाठी शाळा सोडू नये. या सरकारवर कितीही आर्थिक संकट आले तरी ही योजना थांबवता कामा नये. मी सर्व सरकारी अधिकाऱ्यांना आवाहन करतो, की तुम्ही तुमच्या मुलांना जसे खायला देता त्या पद्धतीने ही योजना राबवा.