नवी दिल्ली : अफगाणिस्तान मध्ये तालिबानी राज्यात सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहेत. सध्या या देशात काय परिस्थिती आहे, भविष्यात काय होणार याबाबत माहिती देणारे अनेक अहवाल आले. येथील नागरिकांना मदत करण्याचेही आवाहन केले गेले. मात्र, परिस्थितीत काही फरक पडलेला नाही. आता तर आणखीच धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तालिबानी राज्यातील अराजकतेमुळे देशातील तब्बल एक कोटी लोक उपासमारीच्या भयंकर संकटाच्या विळख्यात सापडले आहेत. संयुक्त राष्ट्र आणि ऑब्जर्वर रिसर्च फाऊंडेशनने हा अहवाल तयार केला आहे.
जून 2022 पर्यंत देशातील पावणे चार कोटी लोकसंख्येपैकी 90 टक्के लोक दारिद्र रेषेच्या खाली असतील. सध्या देशातील 50 टक्के शाळा बंद आहेत. तसेच 150 सरकारी विद्यापीठे मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. अमेरिकेसह अन्य जागतिक वित्तीय संस्थांनी मदत देणे बंद केले आहे. त्याचा परिणाम देशाच्या बजेटवर झाला आहे. 2020 मध्ये देशाचे बजेट 41 हजार कोटी रुपयांचे होते ते आता फक्त 3 हजार 800 कोटी रुपयांवर आले आहे. आधीच गरीबी आणि दुष्काळाचा सामना करत असलेल्या या देशाचे जवळपास 70 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत थांबवली गेली आहे. ऑगस्ट 2021 नंतर तब्बल 8 लाख कर्मचाऱ्यांना पगारही मिळालेला नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. या संकटात देशातील सर्वसामान्य नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागला आहे. या संकटात देशात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. देशातील तब्बल 5 लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. सध्याची बेरोजगारी अशीच चालू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत 9 लाख लोक नोकऱ्या गमावतील असा इशारा आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने दिला आहे.
देशातील आर्थिक संकट आणि प्रशासनातील बदल यामुळे बेरोजगारीत लक्षणीय वाढ झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. बुधवारी जारी केलेल्या मूल्यांकन अहवालात, ILO ने देशातील वाढत्या बेरोजगारीबाबत इशारा दिला आहे. असे म्हटले आहे, की बेरोजगारीचा सध्याचा कल असाच सुरू राहिल्यास 2022 च्या मध्यापर्यंत सुमारे 9 लाख लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील, टोलो न्यूजने वृत्त दिले आहे. ILO च्या अहवालानुसार 2021 च्या तिसऱ्या तिमाहीत रोजगारामध्ये 16 टक्क्यांनी घट झाली आणि 2022 च्या मध्यापर्यंत ती 28 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.