Gautam Adani Biography: मुंबई : सध्या गौतम अदानी यांच्या ग्रुपच्या बातम्या जगभरात चर्चेत आहेत. हिंडेनबर्ग रिसर्च यांच्या अहवालातील धक्कादायक वाटणाऱ्या गोष्टीमुळे त्यांचे श्रीमंत व्यक्तिमधील स्थान झपाट्याने खाली आलेले आहे. तसेच गौतम अदानी यांचा ग्रुप कोसळला तर भारतातील एलआयसी संस्थेसह अनेक वित्तसंथा आणि कर्ज देणाऱ्या बँका देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अनेकांना गौतम अदानी यांची स्टोरी नेमकी काय आहे याबद्दल उत्सुकता आहे. सध्या भारतात तरी असा व्यक्ती सापडणे मुश्किल आहे ज्याने त्यांचे नाव कधी ऐकलेच नसेल. कारण भारतातील श्रीमंतांच्या यादीत अदानी अव्वल स्थानावर आहेत.
गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले असल्याचे श्रेय अनेकजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देतात. कारण मोदी मुख्यमंत्री ते पंतप्रधान होण्याच्या काळात निवडणूक प्रचारात गौतम अदानी यांचे प्रायव्हेट जेट देशभरात फिरवत असल्याचे अवघ्या जगाने पाहिले आहे. त्यामुळे गौतम अदानी यांची फुगलेली संपत्ती अनेकांना काळीबेरी असल्याचे वाटते, तर भाजप आणि मोदी समर्थक यांना त्यांच्या श्रीमंतीचा अभिमान वाटतो. सध्या त्यांच्याकडील संपत्तीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज या लेखात आपण अदानी ग्रुप्सचे मालक, चेअरमन आणि संस्थापक यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी जाणून घेणार आहोत. हे तुम्हाला माहीत नसेल की सुरुवातीच्या काळात अदानी हे फक्त हिरे कंपनीत काम करायचे. आणि आज तो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मिरवत आहेत. त्यांचा हा प्रवास अनेकांना स्वप्नवत वाटत आहे. आज या लेखातून आपल्याला अदानी यांचे करिअर कुटुंब, त्यांचा व्यवसाय अशा अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे. अदानी आज भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले याची माहिती घेऊया.
- गौतम अदानी यांचा परिचय :
- पूर्ण नाव : गौतम शांतीलाल अदानी
- व्यवसाय ओळख : अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक
- शारीरिक रचना : उंची (अंदाजे) ५ फूट ६ इंच, वजन 85 किलो, काळा डोळ्याचा रंग, केसांचा रंग काळा
- वैयक्तिक माहिती : जन्मतारीख 24 जून 1962, वय ६० वर्षे (२०२२ प्रमाणे)
- जन्मस्थान : अहमदाबाद, गुजरात, भारत
- राशिचक्र : कर्क
- राष्ट्रीयत्व : भारतीय
- मूळ गाव : अहमदाबाद, गुजरात
- शाळा : शेठ चिमणलाल नगिनदास विद्यालय, अहमदाबाद, भारत
- महाविद्यालय/विद्यापीठ : गुजरात विद्यापीठ, भारत
- शैक्षणिक पात्रता : बॅचलर इन कॉमर्स सुरू (दुसरे वर्षी बाकी)
- धर्म : जैन
- पत्ता : मिठाखली क्रॉसिंग, नवरंगपुरा, अहमदाबाद-380009, गुजरात
- छंद : नौकानयन, पुस्तके वाचणे, चित्रपट-फोटोग्राफी पाहणे
गौतम अदानी यांचा जन्म आणि सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण : अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद येथे एका सामान्य जैन कुटुंबात झाला. गौतम अदानी यांचे वडील शांतीलाल अदानी हे एक छोटे कापड व्यापारी होते आणि त्यांच्या आईचे नाव शांताबेन अदानी होते, त्या गृहिणी होत्या. गौतम अदानी यांना ७ भावंडे असून त्यांची नावे मनसुख अदानी, वसंत एस. अदानी, राजेश शांतीलाल अदानी आणि विनोद अदानी आहे. गौतम अदानी नावाच्या या श्रीमंत व्यक्तीने कोणत्याही परदेशी शाळा किंवा महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले नाही, तर गावच्या शाळेतच त्यांनी शिक्षण घेतले आहे. त्यांनी प्रारंभिक शिक्षण सेठ चिमणलाल नागीदास शाळेतून पूर्ण केले आणि पुढील शिक्षण गुजरात विद्यापीठातून केले. अदानी यांनी कॉमर्स ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला होता, मात्र, त्यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षातच कॉलेज सोडले. अर्थातच त्यांच्याकडे कोणतीही पदवी नाही. मात्र, जगभरातील प्रमुख विद्यापीठाचे पदवीधर त्यांच्याकडे आता पाणी भरत आहेत.
गौतम अदानी यांचा विवाह प्रीती अदानी यांच्या सोबत 1998 मध्ये झाला. प्रिती यांचा जन्म 1965 मध्ये मुंबईतील एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांनी अहमदाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयातून बॅचलर ऑफ डेंटल सर्जनची पदवी प्राप्त केली आहे. आता त्या अदानी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. गौतम अदानी यांना करण अदानी आणि जीत अदानी अशी दोन मुले आहेत. त्यातील करण यांचे लग्न झाले असून त्यांच्या पत्नीचे नाव परिधी अदानी आहे. करण आणि परिधी यांना अनुराधा अदानी नावाची एक मुलगीदेखील आहे.
करण हा गौतम अदानी यांचा मोठा मुलगा असून त्यांचा जन्म 7 एप्रिल 1987 रोजी अहमदाबाद येथे झाला. त्यांनी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी केल्यावर ते सध्या पोर्ट्स आणि एसईझेडचे सीईओ आणि अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे संचालक, याशिवाय एससीसी लिमिटेडचे अध्यक्ष बनवले आहे. तर, गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला. जीत अदानी यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. करण आणि परिधी यांचे फेब्रुवारी 2013 मध्ये लग्न झाले असून परिधी ही कॉर्पोरेट लॉयर सिरिल श्रॉफ यांची मुलगी आहे. परिधी याही वकील आहेत. परिधी अदानी या अमरचंद मंगलदास यांच्या गुजरात कार्यालयाच्या प्रमुख आहेत. परिधी यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून एलएलबी केल्यावर सुरुवातीच्या काळात इकॉनॉमिक टाईम्स आणि CNBC-TV18 मध्ये इंटर्नशिप देखील केली आहे. परिधी आणि करण यांना 2016 मध्ये अनुराधा अदानी नावाची मुलगी झाली आहे.
व्यावसायिक सुरुवात : गौतम अदानी यांचे वडील कापड व्यापारी होते. मात्र, वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याऐवजी त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 1978 मध्ये किशोरवयीन असताना वयाच्या 16 व्या वर्षी गौतम अदानी हे मुंबईत महेंद्र ब्रदर्सच्या डायमंड कंपनीत डायमंड शॉर्टर करत होते. येथे काम करत असताना त्यांनी व्यापारातील अनेक युक्त्या शिकल्या आणि काही वर्षांनी झवेरी बाजार येथे स्वतःची हिरे ब्रोकरेज फर्म सुरू केली. ब्रोकरेजची स्थापना केल्यानंतर मोठा भाऊ मनसुख भाई अदानी यांनी त्यांना 1981 मध्ये गुजरातला परत बोलावले. त्यावेळी भावंडांनी प्लास्टिक कारखान्यात काम सुरू केले. प्लॅस्टिक कारखान्याच्या व्यवसायाचा विस्तार केल्यानंतर अदानी यांनी छोट्या कामांसाठी / उद्योगांसाठी प्राथमिक पॉलिमर आयात करण्यासाठीचे काम सुरु केले. त्यानंतर त्यांनी 1988 मध्ये अदानी कमोडिटी एक्सपोर्ट-इम्पोर्ट कंपनी स्थापन केली. आता याच कंपनीचे नाव अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड असे करण्यात आले आहे.
1991 मध्ये आर्थिक सुधारणांमुळे अनेकांना मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. तत्कालीन कॉँग्रेस सरकारच्या मदतीने जागा मिळवण्यासह अदानी यांचा व्यवसाय विविध क्षेत्रांमध्ये पसरला. ते एक बहुराष्ट्रीय व्यापारी बनण्याची ही सुरुवात होती. आर्थिक उदारीकरणाच्या धोरणांमुळे त्यांनी कपडे, धातू आणि शेती व्यवसाय यावर फोकस केले. दरम्यान, 1993 मध्ये गुजरात सरकारने मुद्रा पोर्ट चालवण्यासाठी एका खाजगी कंपनीला काम देण्याची घोषणा केली. 1995 मध्ये गौतम अदानी यांना कंत्राट याचे मिळाले. त्यानंतर सरकारी धोरणांचा खुबीने वापर करून किंवा प्रसंगी धोरणात बदल करून घेऊन अदानी पोर्ट ही कंपनी भारतातील सर्वात मोठी खाजगी मल्टी पोर्ट ऑपरेटर बनली आहे. मुद्रा पोर्ट हे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठे बंदर असून ज्यामध्ये दरवर्षी सुमारे 210 दशलक्ष टन माल हाताळला जातो.
त्यांनंतर सन 1996 मध्ये अदानी समूहाने अदानी पॉवर लिमिटेड ही वीज व्यवसायाची शाखा सुरु केली. आता अदानी पॉवरचे एकूण 4,620 मेगावॅट क्षमतेचे थर्मल पॉवर प्लांट असून ते देशातील सर्वात मोठे खाजगी औष्णिक वीज उत्पादक बनले आहेत. 2006 मध्ये गौतम अदानी यांनी वीज निर्मितीचे काम सुरू केल्यानंतर अदानी समूहाने ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियामध्ये खाणी (खाण), बंदर आणि रेल्वे असे अनेक व्यवसाय सुरू केले आहेत. 2010 मध्ये त्यांनी इंडोनेशियामध्ये खाण व्यवसाय सुरू केल्यावर 2011 मध्ये अदानी यांनी ऑस्ट्रेलियाचे अॅबॉट पॉइंट कोल टर्मिनल $2.72 मध्ये विकत घेतले आहे.
गौतम अदानी यांच्याकडे फेरारी, लिमोझिन, बीएमडब्ल्यू या स्वतःच्या महागड्या गाड्या असून स्वतःची खासगी जेट आहेत. 2007hawker 850, Embraer Legacy 650, आणि Bombardier Challenger 605 हे सर्व त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध असे जेट आहेत. गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास ते पहिले आशियाई आणि पहिले भारतीय व्यक्ती श्रीमंत आहेत, ज्यांचा जगातील 3 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 16 सप्टेंबर 2022 रोजी गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या दुसऱ्या स्थानावरून जेफ बोझोसला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते.
अदानी यांचेही अपहरण झाले होते : अनेक वर्षांपूर्वी अदानी यांचे अपहरण करण्यात आले होते. काही लोकांनी त्यांची गाडी थांबवून त्यांना उचलून नेले होते. त्यामागे 15 लाखांची खंडणी हे कारण असल्याचे कारण पुढे केले होते. लंडनच्या फायनान्शिअल टाईम्सवर गौतम अदानी यांनी याचा खुलासा केला होता. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलवर झालेल्या हल्ल्यात गौतम अदानी थोडक्यात बचावले होते. अदानी समूहाने 1996 मध्ये अदानी फाउंडेशनची स्थापना केल्यावर गुजरात, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काम केले आहे. या संस्थेद्वारे, शिक्षण, गरीब लोकांना कमाईच्या संधी आणि अनेक ग्रामीण पायाभूत सुविधांचा विस्तार इत्यादींवर लक्ष केंद्रित केले जाते.
गौतम अदानी वाद : गौतम अदानी यांच्याशी संबंधित अनेक उलटसुलट चर्चा सुरू असतात. यातील मुख्य वाद म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. या वादाचे कारण असे सांगण्यात आले की, अदानी यांनी मोदीजींना अदानी ग्रुपचे चार्टर्ड विमान वापरण्यास दिले होते. जेणेकरून ते देशातील विविध ठिकाणी निवडणूक प्रचार रॅलीत वेळेत आणि जास्त ठिकाणी पोहोचू शकतील. अदानी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी घट्ट मैत्री असल्याचेही सांगितले जाते. त्यामुळेच मोदीजी हे गौतम अदानी यांना त्यांच्या कामात पाठिंबा देतात आणि त्याद्वारे ते जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी सज्ज झाल्याची चर्चा असते.
अदानी समूहाच्या मीडिया समूह MMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने ऑगस्ट 2022 मध्ये नवी दिल्ली टेलिव्हिजन (NDTV) चे 29.18% RRP होल्डिंग विकत घेण्याची योजना आखली असल्याची बातमी आली होती. त्यावेळी NDTV ने एका निवेदनात म्हटले होते की, कंपनीच्या संस्थापकांना याबाबत कोणतीही माहिती न देता अदानी समूहाने तृतीय पक्षांच्या मदतीने आपला हिस्सा मिळवला आहे. चर्चा, संमती किंवा सूचना न देता हा करार करण्यात आला होता. ही गोष्ट सुद्धा अदानी आणि मोदीजींच्या मैत्रीशीही जोडली जात होती. भारतातील पत्रकारिता/संपादकीय स्वातंत्र्याबद्दलही चिंता व्यक्त केली जात आहे.