मुंबई : कोरोनाच्या संकटात सर्वच क्षेत्रावर गंभीर परीणाम झाला आहे. कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रम, नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र सांस्कृतिक कार्यमंत्रालयाने कलाकारांसाठी मासिक मानधन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कलाकारांना दिलासा मिळाला होता.
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील 48 हजार कलावंतांना मासिक मानधन सुरू करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला. त्यात राज्यातील वारकरी सांप्रदायाचा सामावेश करण्याची मागणी वारकरी परीषदेचे विठ्ठल पाटील यांनी केली होती. त्यास राज्य सरकारने पाठींबा देत वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांचा सामावेश करून घेण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्य सरकारकडून राज्यातील कीर्तनकार, गायक आणि पखवाजवादक यांचा सर्व्हे करून त्यांना कोरोनाकाळात पाच हजार रूपयांचे मासिक मानधन मिळणार आहे.
राज्यात 10 हजारापेक्षा जास्त वारकरी कीर्तनकार, गायक, पखवाजवादक आहेत. त्यांना या घोषणेचा फायदा होणार आहे. तसेच राज्यातील पारंपरिक वारकरी फड प्रमुखाला कायमस्वरुपी मानधन देण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तर संत विद्यापीठासह इतर मागण्यादेखील तत्वतः मान्य केल्याचे वारकरी परिषदेचे विठ्ठल पाटील यांनी सांगितले.
वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे, ज्ञानोबा-तुकाराम यांसह इतर संंत परंपरा आणि फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारसरणीचा महाराष्ट्र अशी राज्याची ओळख आहे. तशीच वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र अशीही राज्याची ओळख आहे. त्यामुळे राज्यातील वारकरी संप्रदायासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करण्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिले.
कोरोना काळात राज्यातील लोककलावंतांना राज्य सरकारतर्फे 5 हजार रूपयांचे मासिक मानधन देण्यात येत आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील कलाकारांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत होत आहे. त्यात वारकरी संप्रदायाचीही नोंद घेण्यात येणार आहे. तसेच वृध्द कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात येईल. याबरोबरच वारकरी संप्रदायाची काळजी घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याने वारकरी संप्रदायाच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.