अहमदनगर : देशात राजकारण वेगाने फिरत आहे. अनेक राज्यातील विरोधकांची सरकारं पाडून भाजपाने सत्तेचा सोपान पार पाडला. राज्यात भाजपाचे सर्वात जास्त 106 आमदार आहेत. तरीही भाजपा विरोधी पक्षात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. मात्र भाजपाकडून सातत्यात फसवणूकीने सरकार स्थापन केले जात असल्याचे म्हटले जात आहे.
ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने सरकार कोसळण्याविषयी भाजप नेत्यांकडून दावा केला जात आहे. यामध्ये आणखी एका भाजपा खासदाराची भर पडली आहे. भाजप खासदार सुजय विखे (BJP MP Dr. Sujay Vikhe ) यांनी दिवाळीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. खासदार सुजय विखे केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी कर्जत तालुक्यात आले होते. तेव्हा डॉ. सुजय विखे यांच्यासमोर राज्य सरकारच्या विविध योजनांसंबधीच्या तक्रारी करण्यात आल्या. तेव्हा सुजय विखे म्हणाले, थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.
भाजपा खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सरकार पडण्याविषयी विधान केल्याने त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. गेल्या अनेक दिवसात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड-कर्जत मतदारसंघाला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विजय मिळवला. लवकरच कर्जत आणि जामखेड नगरपालिकांच्या निवडणूकीचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.