दिल्ली : सध्या श्रीलंकेत खाद्य पदार्थांचे संकट इतके वाढले आहे, की तेथील लोकांना सोने खरेदी करण्यापेक्षा खाद्यपदार्थ विकत घेणे कठीण झाले आहे. देशाचा परकीय चलन साठा जवळपास रिकामा आहे. चीनसह अनेक देशांच्या कर्जाखाली दबलेला श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. जानेवारीमध्ये श्रीलंकेचा परकीय चलन साठा 70 टक्क्यांनी घसरून $2.36 अब्ज झाला आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे श्रीलंकेला परदेशातून अन्न, औषध आणि इंधन यासह सर्व आवश्यक वस्तू आयात करणे अशक्य आहे.
एन.के. सिलोन बेकरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष जयवर्धने म्हणाले की, काही शहरी भागात स्वयंपाकाच्या गॅसच्या कमतरतेमुळे ब्रेडच्या किमती दुप्पट होऊन सुमारे 150 श्रीलंकन रुपये ($0.75) पर्यंत पोहोचल्या आहेत. श्रीलंकेत एलपीजीचा प्रचंड दुष्काळ आहे, त्यामुळे 1000 बेकरी बंद कराव्या लागल्या आहेत. त्यात आता इंधनानेही झटका दिला आहे. खरं तर, श्रीलंकन रुपयाच्या प्रचंड अवमूल्यनामुळे कंपनीने पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत वाढ केली आहे. वाढलेले दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत. एका महिन्यात कंपनीने इंधनाचे दरवाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे.
लंका इंडियन ऑइल कंपनी (LIOC) ने सांगितले की डिझेलच्या किरकोळ किमतीत प्रति लिटर 75 रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत 50 रुपये प्रति लिटरने वाढ केली आहे. आता येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर 254 रुपये आणि डिझेलचा दर 214 रुपये प्रतिलिटर झाला आहे. LIOC चे व्यवस्थापकीय संचालक मनोज गुप्ता म्हणाले, की “सात दिवसांत, श्रीलंकन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 57 रुपयांनी घसरला आहे. याचा थेट परिणाम तेल आणि पेट्रोल उत्पादनांच्या किमतीवर होतो. रशियाने युक्रेनवर केलेल्या हमल्यानंतर पाश्चात्य देश रशियावर निर्बंध टाकत आहेत, त्यामुळे तेल आणि वायूच्या किमतीही वाढत आहेत. गुप्ता म्हणाले, की सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या वाढत्या किमतींमुळे आमचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे किंमती वाढ करण्याशिवाय पर्याय नाही. किंमतीत वाढ करुनही, मोठे नुकसान सहन करावे लागेल.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची