दिल्ली : श्रीलंकेच्या दुर्दशेचा अंदाज यावरूनही लावला जाऊ शकतो की लोकांना अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी घरातील दागिने विकणे भाग पडले आहे. कोलंबोची सर्वात मोठी सराफा बाजारपेठ कोलंबो गोल्ड सेंटर येथील अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले की, लोकांना दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी दागिने विकणे भाग पडले आहे. उद्योगपती सिल्वा यांच्या म्हणण्यानुसार, ‘श्रीलंकेत असे संकट याआधी आम्ही पाहिले नव्हते. श्रीलंकन चलनाच्या मूल्यात झालेल्या ऐतिहासिक घसरणीनंतर दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आणि विक्रेते जास्त झाले आहेत.
श्रीलंका 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकन रुपया हे सर्वात कमकुवत चलन बनले आहे. शनिवारी एका श्रीलंकन रुपयाची किंमत 315 डॉलर होती. खाजगी मनी एक्सचेंजेस एका डॉलरसाठी 345-380 श्रीलंकन रुपये आकारत आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत 2.05 लाख श्रीलंकन रुपयांवर पोहोचली आहे.
श्रीलंकेचे अर्थमंत्री साबरी यांनी शनिवारी सांगितले की, आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि अत्यावश्यक वस्तू पुरवठा साखळी दुरुस्त करण्यासाठी पुढील सहा महिन्यांत देशाला 3 अब्ज डॉलर्सची मदत लागेल. ते म्हणाले, की ‘खूप अवघड काम आहे.’ रॉयटर्सला दिलेल्या खास मुलाखतीत साबरी म्हणाले, की ‘आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (आयएमएफ) चर्चा करण्यास तयार आहोत.
आंतरराष्ट्रीय सार्वभौम रोख्यांची पुनर्रचना करणे, कर्ज भरणा स्थगित करणे आणि जुलैमध्ये $1 अब्ज कर्ज परत करण्यासाठी अधिक वेळ मागणे यासारखे प्रयत्न केले जात आहेत. जेपी मॉर्गन येथील विश्लेषकांना अपेक्षा आहे, की श्रीलंकेची चालू वित्तीय तूट $3 अब्ज असेल आणि ती वर्षाच्या अखेरीस $7 अब्जपर्यंत पोहोचेल.
ANI नुसार, श्रीलंकेच्या संसदेचे अधिवेशन 19 ते 22 एप्रिल दरम्यान सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, 3 एप्रिल रोजी 26 कॅबिनेट मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. 42 खासदारांनी साथ सोडल्याने सरकार अल्पमतात आले आहे. विरोधी पक्ष राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या तयारीत आहेत.
चिन्यांचा खतरनाक खेळ..! फक्त श्रीलंकाच नाही तर तब्बल ‘इतके’ देश अडकलेत ‘त्या’ सापळ्यात..