दिल्ली : स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात वाईट अशा आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेने इराक, नॉर्वे आणि ऑस्ट्रेलियातील आपले दूतावास बंद केले आहेत. कारण, सरकारकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. श्रीलंकेच्या सरकारने मंगळवारी जाहीर केले, की ते 30 एप्रिलपासून नॉर्वे, इराक आणि ऑस्ट्रेलियातील त्यांचे दूतावास तात्पुरते बंद करत आहेत. याआधी रविवारी श्रीलंका सरकारच्या प्रत्येक मंत्र्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि त्यांचे बंधू पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता इतर सर्व नेत्यांनी सरकार सोडले आहे.
अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी सर्व राजकीय पक्षांना मंत्रीपद स्वीकारण्यास सांगितले होते परंतु, सर्व पक्षांनी एकमताने नकार दिला. मंगळवारी आघाडीतील 41 खासदारांनी सरकार विरोधात असंतोष व्यक्त करत सभागृहातून सभात्याग केला. इतकेच नाही तर श्रीलंकेच्या सेंट्रल बँकेचे गव्हर्नर अजित काब्राल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. खाद्यपदार्थांचे भाव प्रचंड वाढले आहेत. देशात अन्नापासून इंधनापर्यंत सर्वच गोष्टींची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले, त्यानंतर सरकारने कर्फ्यू लावला होता. जो नंतर उठवण्यात आला होता. पण तरीही देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे.
संकटाच्या काळात श्रीलंकेला भारताने मदत देऊ केली आहे. आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने श्रीलंकेला US $ 1 अब्ज कर्ज देण्याची घोषणा केली आहे. प्रचंड कर्जबाजारी श्रीलंकेचा परकीय चलन साठा ठप्प झाला आहे. याशिवाय श्रीलंकेचे चलनही प्रचंड घसरले आहे. श्रीलंकेत आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये चीनच्या कर्जाचाही हातभार आहे.
चीनच्या कृपेने श्रीलंका बेहाल..! पहा काय वाईट स्थिती झालीय शेजारी देशाची