नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत महागाईचा भडका उडाला आहे. तर परकीय चलनाचा साठाही जवळपास रिकामा आहे. या वाईट परिस्थितीत, श्रीलंका सरकारने 1.2 अब्ज डॉलर आर्थिक मदत पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, श्रीलंकेवर हे संकट का आले आहे यासाठी चीन काही प्रमाणात जबाबदार असल्याचे मानले जात आहे. आता या देशाने या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि दिवाळखोरी होऊ नये, यासाठी सोन्याची विक्री सुरू केली आहे. असे करून हा देश आपल्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.
सोने विकून देखील आर्थिक संकट अद्याप मिटलेले नाही. त्यामुळे या देशाला भारताकडून आणखी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. श्रीलंकेच्या सरकारने भारताकडून 1.5 अब्ज डॉलर मदत मिळण्याची अपेक्षा असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे, काही आठवड्यांआधी भारताने श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज आणि पेमेंट बॅलन्स सपोर्टची घोषणा केली होती.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की, आपण ज्या संकटातून जात आहोत, त्या काळात भारताकडून आणखी मदत मिळू शकते. माहिती देताना ते म्हणाले की, मदत पॅकेज मिळाले आहे. त्याचप्रमाणे, आम्हाला आणखी 1.5 अब्ज डॉलर मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी (आयएमएफ) संपर्क करण्याचा पर्याय अद्यापही आमच्यासमोर असल्याचे श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात श्रीलंका आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडेही मदत मागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, श्रीलंकेत चलनवाढीचा विक्रम कायम आहे. राष्ट्रीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार श्रीलंकेचा चलनवाढीचा दर डिसेंबर 2021 मध्ये 11.1 टक्क्यांवरून 14 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे सरकारी सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे. श्रीलंकेत सलग दुसऱ्या महिन्यात महागाई वाढली असून नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदाच दोन अंकी वाढ नोंदवली होती.
श्रीलंकेला परकीय चलनाच्या प्रचंड संकटाचा सामना करावा लागत आहे. आयातीसाठी देय देण्यासाठी डॉलरच्या कमतरतेमुळे देशाला जवळपास सर्व जीवनावश्यक वस्तूंचा दुष्काळ जाणवत आहे. तसेच राज्य वीज युनिटला टर्बाइन चालवण्यासाठी इंधन मिळू न शकल्यामुळे वीज कपात केली जाते. वीज मंडळ भरमसाट बिले भरू न शकल्याने राज्य इंधन युनिटने तेल पुरवठा बंद केला आहे. एकमेव रिफायनरी अलीकडेच बंद करण्यात आली कारण ती क्रूड तेल आयातीसाठी डॉलर्स देऊ शकत नव्हती.