SRH vs RR Qualifier 2 Highlights: राजस्थानला धक्का देत हैदराबाद फायनलमध्ये!

SRH vs RR Qualifier 2 Highlights : चेपॉक स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 36 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आयपीएलच्या इतिहासात हैदराबादने तिसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता 26 मे रोजी हैदराबादचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी करताना हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते. याला प्रत्युत्तर देताना राजस्थानचा संघ केवळ 139 धावांपर्यंत मजल मारू शकला.

लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानने 7.4 षटकात 1 विकेट गमावून 67 धावा केल्या होत्या. यानंतर हैदराबादचे डावखुरे फिरकीपटू शाहबाज अहमद आणि अभिषेक शर्मा यांनी असा कहर केला की त्यांची धावसंख्या 11.4 षटकांत 92 धावांत 6 बाद झाली. बाद झालेल्या फलंदाजांमध्ये यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि रायन पराग यांसारख्या मोठ्या विकेट्सचा समावेश होता.

 यशस्वीने 21 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. तर सॅमसन फक्त 10 धावा करू शकला आणि पराग फक्त 6 धावा करू शकला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या ध्रुव जुरेलने चांगली झुंज दाखवली, मात्र तो एकाकी पडला. जुरेलने 35 चेंडूत 56 धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 2 षटकार आले. हैदराबादचा प्रभावशाली खेळाडू शाहबाजने 4 षटकांत 23 धावा देत 3 बळी घेतले. अभिषेकने 4 षटकात 24 धावा देत सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरचे विकेट घेतले. कर्णधार पॅट कमिन्स आणि टी नटराजन यांच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट जमा झाली.

Leave a Comment