SRH vs DC Updates : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी आयपीएलच्या चाळीसाव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (DC) सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध लढत झाली. या सामन्यात हैदराबादच्या संघाने शानदार कामगिरी करत दिल्लीवर 9 धावांनी विजय मिळवला.
हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्मा (67) आणि हेन्री क्लासेनच्या नाबाद 53 धावांच्या जोरावर 197 धावा केल्या. मिचेल मार्शने चांगली गोलंदाजी करताना चार बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खूप खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच ओव्हरमध्ये कर्णधार डेव्हिड वॉर्नरला शून्य धावांवर क्लीन बोल्ड केले. मात्र, यानंतर फिल सॉल्ट (59) आणि मिचेल मार्श (63) यांच्यात शतकी भागीदारी झाली. दोघे बाद झाल्यानंतर दिल्लीला सावरता आले नाही आणि त्यांना केवळ 188 धावा करता आल्या. मार्कंडेयने दोन गडी बाद केले.
सनरायझर्स हैदराबादने दिल्लीचा 9 धावांनी पराभव करत मागील पराभवाचा बदला घेतला. दिल्लीकडून फिल सॉल्ट आणि मार्शने चांगली फलंदाजी केली. मधल्या फळीतील फलंदाजांनी दिल्लीची निराशा केली. अक्षर पटेलने अखेरची लढत दिली, मात्र तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नाही.