मुंबई : आयपीएल (IPL) 2022 च्या पहिल्या सामन्यात (Match) कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक (Toss) हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने महेंद्रसिंग धोनीच्या नाबाद 50 धावांच्या जोरावर 20 षटकांत 5 गडी गमावून 131 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकात्याने 18.3 षटकांत चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. केकेआरकडून अजिंक्य रहाणेने 44 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाड शून्य, डेव्हॉन कॉनवे तीन धावा, रॉबिन उथप्पा २८ धावा, अंबाती रायुडू १५ धावा आणि शिवम दुबे तीन धावा करून बाद झाले. चेन्नईने 61 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. यानंतर धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी 56 चेंडूत 70 धावांची नाबाद भागीदारी केली.
धोनी आणि जडेजाने शेवटच्या पाच षटकांत ५८ धावा जोडल्या. जडेजा 28 चेंडूत 26 धावा करून नाबाद राहिला. त्याने 20 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला. कोलकाताकडून उमेश यादवने दोन, तर वरुण चक्रवर्ती-आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. धोनीने 38 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने 38 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 50 धावा केल्या. धोनीचे आयपीएल कारकिर्दीतील हे २४ वे अर्धशतक होते. त्याने 35 महिन्यांनंतर आयपीएलमध्ये अर्धशतक केले. त्याने 21 एप्रिल 2019 रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध केलेले शेवटचे अर्धशतक होते.
- Jio चा IPL धमाका प्लान..! खास आयपीएलसाठी आणलाय ‘हा’ रिचार्ज प्लान; पहा, किती पैसे होतील खर्च
- पीजन इंडक्शनवर तब्बल 25 % सूट..! ऑफर एनकॅश करण्यासाठी https://bit.ly/3or13Lh यावर क्लिक करून पहा..
132 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर यांनी कोलकाता संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी झाली. ड्वेन ब्राव्होने व्यंकटेशला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर नितीश राणाने काही जबरदस्त फटके मारले, पण ब्राव्होने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
नितीश 17 चेंडूत 21 धावा करून बाद झाला. रहाणेला चांगली सुरुवात केल्यानंतर त्याचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आले नाही आणि त्याचे अर्धशतक हुकले. रहाणे 34 चेंडूत 44 धावा काढून बाद झाला. त्याने या खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला. सॅम बिलिंग्ज आणि श्रेयस अय्यर यांनी मिळून कोलकाताचा डाव 100 धावांच्या पुढे नेला.
बिलिंग्ज 22 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि शेल्डन जॅक्सनने मिळून कोलकाताला विजय मिळवून दिला. श्रेयसने 19 चेंडूत 20 आणि शेल्डनने तीन धावा केल्या. चेन्नईकडून ब्राव्होने तीन बळी घेतले. त्याचवेळी मिचेल सँटनरला एक विकेट मिळाली. यासह ब्राव्होने लसिथ मलिंगाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. दोघांच्या नावावर सध्या 170-170 विकेट आहेत. अमित मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत 166 विकेट घेतल्या.