मुंबई – आयसीसीच्या (ICC) ताज्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) कसोटीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. त्याने वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरला मागे टाकले आहे.
दुसरीकडे, रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जडेजाने चमकदार कामगिरी केली. या सामन्यात त्याने नाबाद 175 धावांची खेळी केली. यानंतर त्याच्या नावावर नऊ विकेट्सही झाल्या. त्याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीतही मिळाला आहे. अश्विननेही या सामन्यात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे, मात्र जडेजाच्या फायद्यामुळे अश्विन दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
अष्टपैलू रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या जडेजाचे 406 गुण आहेत. होल्डरचे 382 आणि अश्विनचे 347 गुण आहेत. बांगलादेशचा शाकिब अल हसन चौथ्या तर इंग्लंडचा बेन स्टोक्स पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला याचा फटका बसला असून तो सहाव्या स्थानावर आला आहे.
https://bit.ly/3gKdz4F मराठमोळ्या खरेदीसाठी मराठमोळे पोर्टल..! होय आम्ही आलोय मराठी माणसांच्या आनंदासाठी..!
कोहली, पंतला फलंदाजांमध्ये फायदा
फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी स्थान मिळवले आहे. कोहली पाचव्या स्थानावर पोहोचला असून पंतनेही पहिल्या दहामध्ये स्थान मिळवले आहे. तो 10व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा एक स्थान गमावून सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन 936 गुणांसह पहिल्या तर इंग्लंडचा जो रूट 872 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या आणि केन विल्यमसन चौथ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजांमध्ये अश्विन आणि बुमराह अव्वल 10 मध्ये कायम
गोलंदाजांच्या क्रमवारीत रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह अव्वल 10 मध्ये कायम आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 892 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अश्विनचे 850 गुण असून ते दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा तिसऱ्या तर पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी चौथ्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह दहाव्या स्थानावर कायम आहे. मोहाली कसोटीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जडेजाला तीन स्थानांचा फायदा झाला असून तो 17व्या स्थानावर पोहोचला आहे. जडेजा दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला आहे.