भारतीय खेळाडूंसाठी खुशखबर..! आयपीएलआधी होणार ‘ही’ सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा.. पहा, काय निर्णय होऊ शकतो..?
मुंबई : देशात कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याचे पाहून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र देशातील कोरोना परिस्थितीचा विचार करत बीसीसीआयने ही स्पर्धा आयोजित करण्याचा विचार सुरू केला आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्या उपस्थितीत बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
ही स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती, मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता मात्र, ही स्पर्धा दोन टप्प्प्यात घेण्यावर विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या स्पर्धेबाबत आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता दिसत आहे. 27 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू करण्याचा विचार आहे. त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात होतील, याची शक्यता नाही. त्यामुळे या स्पर्धा आता दोन टप्प्यात होतील, असेच दिसत आहे.
सलग दुसऱ्या वर्षी रणजी ट्रॉफीवर कोरोनाचा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे बोर्डाने स्पर्धा रद्द केली होती. 1934-35 मध्ये भारताची ही प्रथम श्रेणी स्पर्धा सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा सलग 85 वर्षे आयोजित करण्यात आली आणि नंतर प्रथमच ती एकाही सामन्याशिवाय रद्द करावी लागली. आता सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करावी लागली.
38 संघांची ही स्पर्धा 13 जानेवारीपासून देशाच्या विविध भागात सुरू होणार होती. मुंबई, ठाणे, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि त्रिवेंद्रम येथे प्रथम गट टप्प्यातील सामने होणार होते. बीसीसीआयने 4 जानेवारी रोजी एक निवेदन जारी करून सांगितले होते की, कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता रणजी करंडक, कर्नल सीके नायडू ट्रॉफी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
रणजी ट्रॉफी व्यतिरिक्त सीके नायडू ट्रॉफी देखील जानेवारी महिन्यात सुरू होणार होती. बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले होते, की ते खेळाडू आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेशी तडजोड करू इच्छित नाहीत आणि म्हणूनच स्पर्धा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती पाहता पुढील निर्णय घेणार असल्याचेही बोर्डाने म्हटले आहे.
वेस्टइंडीज च्या अडचणीत होणार वाढ, भारताचा ‘हा’ फिरकीपटू करणार संघात कमबॅक