मुंबई : दक्षिण आफ्रिकेने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारतीय संघाचा पराभव केला. यावेळी संघातील मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरल्याचे दिसून आले आणि हे देखील मालिकेत पराभवाचे एक मोठे कारण आहे. रोहित शर्माच्या दुखापतीमुळे के एल राहुलने मधल्या फळीत येण्याऐवजी सलामीला येऊन फलंदाजी केली. मात्र, कर्णधार म्हणून त्याची रणनिती अपयशी ठरली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मधल्या फळीची जबाबदारी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्याकडे होती. श्रेयसने तीन सामन्यांत केवळ 54 रन केले होते, तर ऋषभ पंतने एका सामन्यात चांगली कामगिरी केली होती. परंतु, दोन सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. त्याचवेळी कर्णधार केएल राहुलने तीन सामन्यांत फक्त 76 रन केले. मधल्या फळीच्या अपयशी कामगिरीमुळे एकदिवसीय मालिका 0-3 अशी गमावली.
आता भारतीय संघाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने एकदिवसीय क्रिकेटसाठी स्टार खेळाडू रवींद्र जडेजाला पाठिंबा दिला आहे, जो मधल्या फळीत संघाचे नेतृत्व करू शकतो. जडेजा हाच खेळाडू ही समस्या सोडवू शकतो. कार्तिकने क्रिकबझला सांगितले की, जडेजा निश्चितपणे मधल्या फळीत फलंदाजीसाठी तयार आहे. त्याऐवजी, मी म्हणेन की तो इतकी चांगली फलंदाजी करतो की तो आणखी आधीच्या क्रमांकावर खेळू शकतो. कार्तिक पुढे म्हणाला की, जडेजा हा सामने जिंकणारा खेळाडू आहे. जडेजा खरोखरच चांगली फलंदाजी करतो. तो मधल्या फळीत चांगली कामगिरी करू शकतो.
दरम्यान, आता पुढील महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेट सामने होणार आहेत. या क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावेळी भारतीय संघ काय कामगिरी करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भारतीय संघ राहणार बिझी, फेब्रुवारीच्या या 10 दिवसांत पाहायला मिळणार चाहत्यांना क्रिकेटचा थरार