मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर आता संघाचा कर्णधार के. एल. राहुल याने पराभवाची कारणे सांगितली आहेत. राहुलने या पराभवाची दोन कारणे दिली आहे. कर्णधार म्हणून राहुल याच्या नेतृत्वात भारतीय संघाने दुसरा कसोटी सामनाही गमावला होता. त्यानंतर आता एकदिवसीय सामन्यातही पराभव झाला आहे. भारतीय संघ मजबूत दिसत असला तरी प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडत आहे.
राहुलने सामन्यानंतर सांगितले की, ‘हा एक चांगला सामना होता. आम्हाला बरेच शिकायला मिळाले. आम्ही चांगली सुरूवात केली होती. पण, मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेऊ शकलो नाही. ते आम्हाला जड गेले. मिडल ओव्हर्समध्ये विकेट घेऊन प्रतिस्पर्धी टीमला कसे रोखता येईल याचा विचार आम्हाला करावा लागेल. तसेच फलंदाजीच्या वेळीही आम्हाला मिडल ओव्हर्समध्ये रन करता आले नाहीत. सामन्यातील पहिल्या 20 ते 25 ओव्हर्समध्ये आम्ही बरोबरीत होतो. त्यावेळी लक्ष्य सहज पूर्ण करू असे वाटले होते. पण, आफ्रिका संघाने चांगली गोलंदाजी केली आणि महत्वाच्या वेळी विकेट घेतल्या. त्यानंतर मात्र आम्हाला पुनरागमन करता आले नाही, असे राहुल याने सांगितले.
आम्हाला मिडल ओव्हर्समध्ये रन करता आले नाहीत, आम्ही 20 रन अतिरिक्त दिले. टीमने काही काळापासून एकदिवसीय सामने खेळलेले नाहीत. पण, 2023 चा विश्वकप हे आमचे ध्येय आहे. यासाठी बेस्ट-11 तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्याने सांगितले.
दरम्यान, आता दोन्ही संघात 21 जानेवारी रोजी दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा राहणार आहे. कारण, हा सामना जर गमावला तर मालिकाही गमवावी लागेल. त्यामुळे हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे महत्वाचे आहे. या सामन्यात भारतीय संघाला आधिक चांगली कामगिरी करावी लागेल, तरच हा सामना जिंकता येणे शक्य होईल.
IND vs SA 1st ODI: 25 वर्षानंतर भारताचा पहिल्यांदाच पराभव, मालिकेत आफ्रिकेने घेतली आघाडी