कोरोनाचा वेस्ट इंडिज दौऱ्याला झटका; फक्त ‘या’ दोन शहरांतच होणार सामने; BCCI निर्णय घेण्याच्या तयारीत
मुंबई : वेस्ट इंडिजचा भारत दौरा यावर्षी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. पण 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्याच्या वेळापत्रकात थोडा बदल करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे हा बदल झाला आहे. वास्तविक, बीसीसीआयने आता वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिका दोनच शहरांमध्ये आयोजित करण्याचा विचार केला आहे. याआधी 6 शहरांमध्ये सामने होणार होते. पण, आता फक्त अहमदाबाद आणि कोलकाता येथेच सामने होतील, अशी माहिती आहे.
या मालिकेत 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने होणार आहेत. मूळ वेळापत्रकानुसार, एकदिवसीय मालिका अहमदाबाद, जयपूर आणि कोलकाता येथे होणार होती. तर, टी-20 मालिका कटक, तिरुवनंतपुरम येथे होणार होती. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 20 फेब्रुवारीला संपणार आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, बुधवारी सचिव आणि अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत केवळ अहमदाबाद आणि कोलकाता येथे सामने आयोजित करण्यावर चर्चा झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत बीसीसीआय याबाबत अंतिम निर्णय घेईल.
2022 मध्ये भारताचे क्रिकेटचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेसोबत टी-20 मालिकाही होणार आहे. याशिवाय या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही होणार आहे. जर कोरोनाचा वेग कमी झाला नाही तर आगामी दौऱ्यांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. येथे एकदिवसीय मालिका सुरू आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौराही कमी करण्यात आला आहे. दौऱ्याच्या वेळापत्रकातून टी-20 मालिका वगळण्यात आली आहे. याबरोबरच एकदिवसीय मालिकेतील सामनेही कमी करण्यात आले आहेत.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचा 31 धावांनी पराभव केला. या पराभवासह दक्षिण आफ्रिका संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसरा सामना 21 जानेवारीला होणार आहे.
वेस्ट इंडिज दौरा संकटात..! BCCI घेऊ शकते ‘हा’ निर्णय.. पहा, काय सुरू आहे क्रिकेट विश्वात