मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. केपटाऊन कसोटीतील विजयासह यजमानांनी भारता विरुद्धची मालिकाही 2-1 अशी जिंकली. या विजयामुळे एकीकडे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या टेबलमध्ये फायदा झाला, तर दुसरीकडे भारतीय संघाला मोठा फटका सहन करावा लागला.
दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न पुन्हा एकदा अधुरे राहिले. केपटाऊन कसोटीच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने 3 विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचे लक्ष्य गाठले. त्याआधी जोहान्सबर्ग येथे 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाने 7 गडी राखून दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला होता. सेंच्युरियन येथे विजय मिळवून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती, परंतु त्यानंतर लागोपाठ पराभवांसह मालिका गमावली.
मालिकेतील शेवटचा सामना गमावल्यानंतर जागतिक कसोटी गुणतालिकेतही भारतीय संघास फटका बसला आहे. या पराभवानंतर भारतीय संघ आता थेट 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयाचा फायदा मिळाला असून हा संघ आता भारतीय संघाच्या पुढे गेला आहे. दक्षिण आफ्रिकेस चौथा क्रमांक मिळाला आहे. 2 सामन्यात दोन्ही सामने जिंकून 100 टक्के विजय मिळवण्याच्या विक्रमासह श्रीलंका पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया 3 विजयांसह 83 टक्के गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्ताननेही तितकेच विजय मिळवले असून त्यांची विजयाची टक्केवारी 75 आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 66 टक्के विजयासह चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. 49 टक्के विजयामुळे भारतीय संघ आता 5 व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दरम्यान, आता या नंतर दोन्ही देशांदरम्यान एकदिवसीय क्रिकेट मालिका होणार आहे. या मालिकेत तीन सामने होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा नाही. विराट कोहली आहे मात्र तो आता कर्णधार नाही. तर या मालिकेसाठी के. एल. राहुल संघाच्या कर्णधारपदी राहणार आहे. याआधी दुसऱ्या कसोटीत राहुल हा कर्णधार होता. मात्र, या कसोटीतही भारतीय संघास विजय मिळवता आला नाही. त्यानंतर आता एकदिवसीय मालिकेत संघ काय कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
… म्हणून श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका आयपीएलसाठी एकदम तयार; जाणून घ्या, काय आहे महत्वाचे कारण