मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरात पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूने उद्या भारतीय संघ केपटाऊन मध्ये मैदानात उतरेल. यावेळी दुसऱ्या कसोटी सामन्यात फिट नसणारा भारताचा कर्णधार विराट कोहली तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची दाट शक्यता आहे.सध्या तीन सामन्यांची मालिका 1 -1 अशी बरोबरीत आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान आफ्रिकेने भारताला पराभूत करत मालिका 1 -1 बरोबरीत केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली फिट नसल्याने त्याच्या जागी संघात हनुमान विहारीला स्थान देण्यात आले होते.
कोहली आपल्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसादिवशी आपली 99वी कसोटी खेळणार आहे. यामुळे कर्णधार कोहलीला हा सामना संस्मरणीय बनवायचा आहे, विराट काही काळापासून प्रचंड दबावाचा सामना करत आहे. दक्षिण आफ्रिकेत तीन दशकांत पहिली कसोटी मालिका जिंकल्यास कसोटी फॉरमॅटमध्ये देशाचा महान कर्णधार म्हणून कोहलीचे नाव निश्चितच प्रस्थापित होईल.
यासाठी मात्र काही काळापासून अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करू शकलेल्या आपल्या फलंदाजांकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. पहिल्या डावात 300 पेक्षा जास्त धावा करणे महत्त्वाचे असणार आहे.