मुंबई : देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी काही निर्बंध जारी केले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आगामी वेस्ट इंडिज दौराही संकटात सापडला आहे. हा दौरा होणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या अनुषंगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा वाढता धोका पाहता बीसीसीआय या दौऱ्यात सुधारणा करुन ठिकाणांची संख्या कमी करू शकते. वेस्ट इंडिजचा संघ 1 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येईल, त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. वेळापत्रकानुसार, हे सर्व सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये होणार आहेत, परंतु बीसीसीआय त्यापैकी तीन ठिकाणे कमी करू शकते. पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. ही अस्थिर परिस्थिती आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्य वेळी निर्णय घेऊ.
दोन्ही संघांमधील एकदिवसीय मालिकेला सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. त्यानंतर, दुसरा सामना (9 फेब्रुवारी) जयपूरमध्ये आणि तिसरा सामना (12 फेब्रुवारी) कोलकात्यात होणार आहे. यानंतर टी-20 मालिकेतील पहिला सामना कटक (15 फेब्रुवारी), दुसरा टी-20 सामना विशाखापट्टणम (18 फेब्रुवारी) आणि शेवटचा टी-20 तिरुअनंतपुरममध्ये (20 फेब्रुवारी) होणार आहे.
दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत देशात कोरोनाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनास रोखण्यासाठी अनेक निर्बंध टाकले आहेत. अशा परिस्थितीत दैनंदीन घडामोडींवरही मोठा परिणाम होत आहे. बीसीसीआयने याआधी काही क्रिकेट स्पर्धा रद्द केल्या आहेत. आता वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मंडळ काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोरोनाने पुन्हा दिलाय धक्का.. बीसीसीआयने आता ‘या’ मोठ्या स्पर्धांबाबत घेतलाय ‘हा’ निर्णय