IPL 2022 : डेव्हिड वॉर्नरही अजूनही रागात.. पहा, आता ‘त्या’ मु्द्द्यावर काय म्हणालाय ?
मुंबई : मागील आयपीएलमध्ये डेव्हिड वॉर्नरची कामगिरी अतिशय खराब राहिली. डेव्हिड वॉर्नरला आयपीएल सुरू असतानाच संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. 2016 मध्ये संघाचे नेतृत्व करताना सनरायझर्स हैदराबादला प्रथमच विजेतेपद मिळवून देणाऱ्या वॉर्नरला आयपीएलच्या शेवटच्या हंगामात तर संघातही घेतले गेले नाही. यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संघातून वगळल्याबद्दल हैदराबाद संघ व्यवस्थापनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.
आयपीएल 2021 मध्ये लागोपाठच्या सामन्यांमध्ये रन न केल्यामुळे आणि फ्रँचायझीबरोबरच्या वादांमुळे संघाने त्याला आगामी आयपीएलसाठी संघात न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यामुळे वॉर्नरला संघात घेण्यासाठी अनेक आयपीएल संघ तयार आहेत.
सनरायझर्स हैदराबादने ज्या पद्धतीने वॉर्नरला संघातून काढून टाकले त्यामुळे तो नाराज होता. याबाबत त्याने अनेकदा सोशल मीडियावर नाराजीही व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर वॉर्नर म्हणाला, की जर तुम्ही एखाद्या कर्णधाराला वगळत असाल आणि नंतर त्याला संघात समाविष्ट केले नसेल, ज्याने तुमच्या संघासाठी खूप काही केले आहे, तर तुम्ही संघात उपस्थित खेळाडूंना काय संदेश देत आहात?, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
शेवटी जे काही घडले, त्याचा तुम्हाला स्वीकार करावाच लागेल. जर तुम्हाला वाटत होते, की चर्चा करावी. तर मग चर्चा करायला हवी होती. पण तसे घडले नाही, असे त्याने सांगितले.
दरम्यान, आगामी आयपीएल क्रिकेट स्पर्धांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. सर्व संघांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना कायम ठेवले आहे. फक्त हैदराबाद संघाने धक्कादायक निर्णय घेत धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर यास रिटेन केले नाही. खरे तर त्यावेळी वॉर्नरची कामगिरी चांगली नव्हती. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतले. तसेच काही सामन्यातही त्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर मात्र टी 20 विश्वकप स्पर्धेत वॉर्नरने अगदीच जबरदस्त कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाला प्रथमच टी 20 विश्वकप जिंकून देण्यात त्याचे मोठे योगदान राहिले.
या कामगिरीमुळे वॉर्नरला पुन्हा महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यास आपल्या संघात घेण्यासाठी आयपीएल क्रिकेट संघांनी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या आयपीएलमध्ये असे काही संघ आहेत, ज्यांना वॉर्नरसारख्या खेळाडूची गरज आहे.
IPL 2022 : डेव्हिड वॉर्नर येणार पण, कोणत्या संघात दिसणार; ‘या’ तीन संघात आहे संधी..