मुंबई : जोहान्सबर्ग कसोटीत विजय मिळवून कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पराभव केला. कर्णधार डीन एल्गरच्या नाबाद 96 रन्समुळे यजमानांनी 7 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने 240 धावांचे लक्ष्य अवघ्या 3 खेळाडू गमावून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज विकेटवर टिकून राहिले आणि अखेरीस त्यांनी कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
उत्कृष्ट गोलंदाजी असलेल्या भारतीय संघाचा पराभव का झाला, नेमके काय कमी पडले, तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यात टिकून राहिलेल्या टीम इंडियाचा पराभव कसा झाला, याची काही कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतली तर लक्षात येईल की भारतीय संघाने सामना का गमावला.
टीम इंडियाला कसोटी क्रिकेटमध्ये विजय मिळवायचा असेल तर जसप्रीत बुमराहवर संघाची भिस्त असते. पण दुसऱ्या कसोटीत या गोलंदाजाने फारच निराशाजनक कामगिरी केली. त्याने विकेट घेण्याचा खूप प्रयत्न केला पण, तो यशस्वी ठरला नाही. बुमराहने प्रत्येक ओव्हरमध्ये सुमारे 4 रन दिले, जे अत्यंत खराब कामगिरी आहे.
के. एल. राहुलचे कर्णधारपद हेही टीम इंडियाच्या पराभवाचे मोठे कारण होते. राहुलने चौथ्या डावात बरेच संरक्षणात्मक निर्णय घेतले, ज्याचा फायदा दक्षिण आफ्रिकेने घेतला. भारतीय कर्णधाराने असे क्षेत्ररक्षण समोर ठेवले, की नवीन फलंदाजांना रन मिळवण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत.
कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या यशात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. पण, दुसऱ्या कसोटीत तो नव्हता. त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर परिणाम जाणवला. संघाची फलंदाजी कमकुवत दिसून आली. तसेच गोलंदाजांच्या कामगिरीवरही परिणाम स्पष्ट दिसत होता.
भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी. डीन एल्गर आणि अन्य खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवता आल्या नाहीत. त्यामुळे हा सामना दक्षिण आफ्रिकेस जिंकता आला.
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा धक्कादायक पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत बरोबरी