उपकर्णधारपदी बुमराह.. ‘या’ दोन खेळाडूंना निवड समितीने दिलाय अप्रत्यक्ष इशारा, जाणून घ्या..
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा नाही, त्यामुळे कर्णधारपदी के. एल. राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच निवड समितीने सर्व अंदाज फोल ठरवत उपकर्णधार म्हणून चक्क वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची निवड केली आहे.
बुमराह उपकर्णधारपदी नियुक्त केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, संघात अन्य खेळाडू असताना त्यांचा विचार न करता बुमराहला हे पद देण्यात आले आहे. त्यामुळे संघातील काही खेळाडूंसमोर आता आव्हान निर्माण झाले आहे. तसे पाहिले तर उपकर्णधार पदी बुमराहला नियुक्त केले जाण्याची शक्यता फार कमी होती. मात्र, बुमराहने सातत्याने चांगली कामगिरी केल्याने निवड समितीने त्याला मोठे पद दिले आहे. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांना मागे टाकून उपकर्णधार म्हणून बुमराहचा विचार करण्यात आला.
उपकर्णधारपदी बुमराहची नियुक्ती पंत आणि अय्यर यांना स्पष्ट संदेश आहे, की त्यांना क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमध्ये सातत्य दाखवावे लागेल. 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून बुमराहने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले की, त्याला केवळ एका मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे निवडकर्त्यांसाठी हा एक सोपा निर्णय होता. प्रसाद म्हणाला, जर वेगवान गोलंदाज सर्व फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी करत असेल तर त्याला उपकर्णधार का बनवू नये, असे त्यांनी सांगितले.