एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा.. पहा, कोण आहे संघाचा कर्णधार; रोहितबाबत काय घेतलाय निर्णय ?
मुंबई : दक्षिण आफ्रिके विरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी आज उशिरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यावेळी निवड समितीने एक मोठा बदल केला. ज्या खेळाडूसाठी संघ निवड करण्यात उशीर झाला, अखेर त्या खेळाडूचा संघात समावेश करता आला नाही. हा खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा. रोहितला दुखापत झाल्याने त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, एकदिवसीय सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश होईल, असे सांगण्यात येत होते. प्रत्यक्षात मात्र, रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेतही दिसणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.
रोहित पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याच्या ऐवजी आता के. एल. राहुल यास संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय ऑफस्पिनर आर. अश्विनचे तब्बल 4 वर्षांनंतर टीम इंडियात पुनरागमन झाले आहे. अश्विन 2017 मध्ये संघात होता. यावेळी संघ व्यवस्थापनाने ऋतुराज गायकवाड आणि अष्टपैलू व्यंकटेश अय्यर यांचा एकदिवसीय संघात समावेश केला आहे. चहल, वॉशिंग्टन सुंदर यांचेही संघात पुनरागमन झाले आहे.
कसोटी मालिकेनंतर, एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होईल. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होतील.
भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय क्रिकेटमधील रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. संघाने 34 पैकी फक्त 10 एकदिवसीय सामने जिंकले आहेत आणि 22 सामने गमावले आहेत. मात्र, गेल्या दौऱ्यावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात प्रथमच एकदिवसीय मालिकेत पराभूत केले. भारताने 6 सामन्यांची मालिका 5-1 ने जिंकली. याआधी 6 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत मात्र पराभव स्वीकारावा लागला होता.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उप-कप्तान), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.