एकदिवसीय मालिकेसाठी होणार टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या, रोहितबाबत काय निर्णय घेणार
मुंबई : कर्णधार पदाच्या मुद्द्यावर वाद सुरू असतानाच काल टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला. कसोटी सामन्यांच्या मालिकेत अद्याप दोन कसोटी सामने बाकी आहेत. त्यानंतर एकदिवसीय सामने सुरू आहेत. मात्र, या सामन्यांसाठी अजूनही संघ व्यवस्थापनाने संघाची घोषणा केलेली नाही. एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अद्याप बरा झालेला नाही, त्यामुळे संघाची घोषणा करण्यास उशीर होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आता एक महत्वाची बातमी मिळाली आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड पहिल्या कसोटीनंतरच होणार होती. मात्र आता संघ निवड पुढे ढकलण्यात आली आहे. कारण, रोहित शर्मा अजून बरा झालेला नाही. या कारणामुळे संघ निवड करुन घोषणा करता आलेली नाही.
इनसाइडस्पोर्टने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड येत्या 24 तासांत होऊ शकते. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा सध्या रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास होण्याची वाट पाहत आहेत. रोहितने पहिली टेस्ट पास केली आहे, परंतु आता त्याला अंतिम फिटनेस टेस्ट पास करायची आहे.
सूत्रांनी सांगितले की, रोहित शर्माने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील प्राथमिक चाचणी पास केली आहे, परंतु आता आम्ही रोहित 100 टक्के फिट होण्याची वाट पाहात आहोत. येत्या 24 तासांत याबाबत निर्णय घेतला जाईल. गरज पडल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे चेतन शर्मा म्हणाले. सध्या आम्ही रोहितच्या फिटनेसला प्राधान्य देत आहोत. पण केएल राहुलही संघात असेल. कदाचित त्याच्याकडे संघाचे नेतृत्व दिले जाऊ शकते. विराट कोहलीही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे रोहित दौऱ्यावर येऊ शकला नाही तरी संघाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. येत्या 19 जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेस सुरुवात होणार आहे.