विजय हजारे ट्रॉफी : शतकांची हॅट्ट्रिक ठोकून या खेळाडूने भारतीय संघाचे ठोठावले दार..
मुंबई : भारताचा उगवता फलंदाज ऋतुराज गायकवाड याने पुन्हा एकदा बॅटने छाप पाडली आहे. 24 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाने विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग तीन शतके झळकावून राष्ट्रीय संघासाठी आपला दावा पक्का केला आहे.
आयपीएलच्या 14 व्या मोसमात 600 हून अधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गेल्या चार दिवसांत तिसरे शतक झळकावले आहे. महाराष्ट्र आणि केरळ यांच्यात शनिवारी राजकोट येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात गायकवाडने 110 चेंडूत शतक पूर्ण केले. त्याने 129 चेंडूत 124 धावा केल्या.
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराजने याआधी मध्य प्रदेशविरुद्ध ११२ चेंडूत १३६ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 14 चौकार आणि 4 षटकार मारले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक झळकावले आणि छत्तीसगडविरुद्ध 154 धावांची नाबाद खेळी खेळली आणि संघाला विजयापर्यंत नेले. यादरम्यान त्याने 143 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 5 षटकार ठोकले.
आयपीएलच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यानंतर ऋतुराजने मागे वळून पाहिले नाही आणि 16 डावात 635 धावा केल्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि 4 अर्धशतकेही झळकावली. त्याने लीगमध्ये 64 चौकार आणि 23 षटकारही मारले. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर म्हणून आपले स्थान निर्माण करणारा ऋतुराज या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तो या स्पर्धेतील सर्वात तरुण ऑरेंज कॅप विजेता ठरला.
भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जायचे आहे जिथे त्यांना तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणे बाकी आहे, अशा परिस्थितीत ऋतुराजने आपल्या कामगिरीने निवड समितीसह सर्वांचे लक्ष वेधून घेत आपला दावाही भक्कम केला आहे.