भारतीय क्रिकेट : एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार रोहितबाबत काय म्हणाले रवी शास्त्री
मुंबई : भारतीय निवडकर्त्यांनी विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला भारताचा नवा एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे आणि आता त्याच्याकडे टी-20 तसेच वनडेचे कर्णधारपद आले आहे. टी-२० आणि एकदिवसीय संघांचे कर्णधार वेगळे नसावेत, असे अनेक बीसीसीआय अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे विराटऐवजी रोहितकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
निवड समितीच्या या निर्णयावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मत व्यक्त केले आहे. संघातील प्रत्येक खेळाडूचा वापर कसा करायचा हे रोहितला माहीत असून तो संघासाठी जे चांगले आहे ते करतो, असे त्याने म्हटले आहे.
कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात रवी शास्त्री भारताचे प्रशिक्षक होते. यावेळी विराटने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आणि शास्त्री यांच्यासोबत मिळून त्याने अनेक कामगिरीही केली. मात्र, या काळात भारतीय संघाला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही. शास्त्री आणि विराट एकमेकांना चांगले समजतात आणि T20 विश्वचषकानंतर शास्त्री म्हणाले होते की विराट वनडेचे कर्णधारपदही सोडू शकतो.
रोहितला भारताचा एकदिवसीय कर्णधार बनवल्यानंतर `द वीक`शी बोलताना शास्त्री म्हणाले की, तो लोकांना प्रभावित करण्याचा विचार करत नाही. संघाच्या हितासाठी तो नेहमी प्रयत्न करतो आणि संघातील प्रत्येक खेळाडूचा वापर कसा करायचा हे त्याला माहीत आहे.
रोहितने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून आठ वेळा भारताला विजय मिळवून दिला आहे, तर दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी, T20 मध्ये रोहितने 22 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे आणि 18 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.