दुबई : टी-20 विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत म्हणाला, भारतीय संघाने 20 ते 25 धावा कमी केल्यामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांवर फारसा दबाव नव्हता. त्यामुळे त्यांनी लक्ष्याचा सहज पाठलाग केला. शाहीन आफ्रिदीने आमच्या फलंदाजांवर दबाव आणला. त्याच्या स्पेलमुळेच आमची फलंदाजी खिळखिळी झाली.
जेव्हा एका पत्रकाराने विराटला टीम कॉम्बिनेशनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा विराट भडकला. तो म्हणाला, तुम्हाला काय वाटते. मला वाटते की आम्ही संघासाठी सर्वोत्कृष्ट खेळ केला आहे. आता तुम्ही कोणाला संघातून काढून टाकणार असे विचारणार. रोहित शर्माला काढून टाकणार का, असेही विचारणार. तुम्हाला काही नवा वाद हवा असेल तर आत्ताच सांगा, अशा प्रकारे विराट चिडला.
आम्ही खेळाचा आदर करणारे आहोत. आम्ही असे नाही ज्यांना एका गेममधून पुढची दिशा दिसत नाही. आम्ही प्रत्येक संघाला समान वागणूक देतो. आता आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जाऊ. पाकिस्तान आज आमच्यापेक्षा चांगला खेळला. तुम्ही 10 विकेट्सने जिंकू शकत नाही. त्यांना श्रेय देणे महत्त्वाचे आहे. आम्ही त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, पण ते आमच्यापेक्षा चांगले खेळले. आम्ही प्रत्येक सामना खेळू आणि जिंकू याची शाश्वती नाही. आम्ही आमच्या परिस्थितीनुसार चांगले प्रयत्न केले, असे विराटने सांगितले.
पाकिस्तानच्या फलंदाजीदरम्यान दव पडू लागल्याने त्याचा त्यांना मोठा फायदा झाला. अनेक लहान घटकांमुळे मोठा फरक पडला. जर आमच्याकडे आणखी 20-25 धावा असत्या तर आम्हाला फायदा झाला असता. पण पाकिस्तानच्या गोलंदाजीने आम्हाला तशी संधी दिली नाही. नाणेफेक देखील महत्वाची भूमिका बजावते, असे विराट म्हणाला.