Sikkim Avalanche : सिक्कीममधील नाथुला भागात मंगळवारी झालेल्या हिमस्खलनात (Sikkim Avalanche) 6 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर 11 जण जखमी झाले. त्याचवेळी जवळपास 80 पर्यटक आत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
जखमींना राज्याची राजधानी गंगटोक येथील रुग्णालयात आणले जात आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, बचाव आणि बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. नाथुला पास हे चीनच्या सीमेवर स्थित आहे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाथुला परिसरात मंगळवारी दुपारी 12.20 च्या सुमारास हिमस्खलन झाले. या घटनेनंतर सहा जणांचा जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये चार पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. गंगटोक ते नाथुला जोडणाऱ्या जवाहरलाल नेहरू रोडला हिमस्खलन झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातापूर्वी 150 हून अधिक पर्यटक अजूनही अडकून पडले आहेत. दरम्यान, बर्फात अडकलेल्या 30 पर्यटकांना वाचवण्यात आले असून त्यांना गंगटोक येथील एसटीएनएम हॉस्पिटल आणि सेंट्रल रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सिक्कीम पोलीस सिक्कीमचे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन, पर्यटन विभागाचे अधिकारी आणि चालकांकडून बचावकार्य सुरू आहे.
चेकपोस्टचे महानिरीक्षक सोनम तेनझिंग भुतिया यांच्या म्हणण्यानुसार, “फक्त 13व्या मैलासाठी पास जारी केले जातात, परंतु पर्यटक परवानगीशिवाय 15व्या मैलाच्या दिशेने जात आहेत. ही घटना 15व्या मैलावर घडली.”