Shiv Sena Survey । राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता विधानसभेपर्यंत महायुती टिकणार का? असा सवाल राजकीय वर्तुळातून समोर येऊ लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून सर्वेक्षण केले जात असून आतापर्यंत शिवसेना शिंदे गटाकडून २ सर्वेक्षण केले आहेत. सर्वेक्षण चाचपणीत शिवसेना शिंदे गट पहिल्या क्रमांकावर असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्याशिवाय १३४ जागांवर शिंदे गटाची परिस्थिती अनुकूल असल्याचं सर्वेक्षणात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
त्यामुळे आता सर्वेक्षणांच्या जोरावर शिवसेना शिंदे गट राज्यात विधानसभेसाठी जास्त जागा मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण महायुतीत आणखी दोन मोठे पक्ष सोबत असल्याने जागा वाटपात तडजोड केली जाऊ शकते. पण उमेदवार निश्चितीबाबत पक्षनेत्यांनीच निर्णय घ्यावा अशी आमदारांची मागणी असल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वेक्षणावरून शिवसेनेच्या ४ ते ५ जागांवरील तत्कालीन खासदारांचे तिकिट कापले होते. त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसला होता. विधानसभेला असा प्रकार होऊ नये याची खबरदारी शिवसेना शिंदे गटाकडून घेतली जात आहे.