Shirdi Loksabha Election | शिर्डी: सर्व घटकांचा विरोध डावलून शिर्डी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी पुन्हा मिळवण्यात यशस्वी ठरलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत. पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या योजनेसाठी असलेले 16 कोटी रुपये अनुदान लाटण्यात यशस्वी झालेल्या खासदार लोखंडे यांची उमेदवारी यामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे.
अनिल घनवट (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष), डॉ. भारत करडक (नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनी) आणि सीमा नारोडे (अध्यक्षा, प. महा. शेतकरी महिला आघाडी) यांनी याप्रकरणी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या अधिपत्याखालील खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर कंपनीने एकाच कुटुंबातील 10 सदस्यांची कंपनी असताना आणि 300 सभासद संख्येची अट असतानाही दोन्हीमध्ये पदाचा गैरवापर करून द्र शासनाचे ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज घेतले आहे. यापोटी 50% म्हणजे 16 कोटी रुपयांचे अनुदान घेतेलेले आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये किमान ३०० सदस्य असावेत. परंतु, सदर कंपनीत फक्त दहा सदस्य आहेत, जे की एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. शेतकरी उत्पादक कंपनीची मागील तीन वर्षे लक्षणीय उलाढाल असावी, अशी महत्त्वाची अट आहे. सदर प्रकरणात खेमानंद दूध आणि कृषी प्रोडुसर कंपनीची काहीही उलाढाल नसताना देखील तिला कोट्यवधीच्या अनुदानासाठी पात्र ठरवले गेले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, गैरप्रकारांनी, नियमांना बगल देवून, यंत्रणेवर दबाव आणून, स्वतःच्या फायद्यासाठी निधी मिळवण्याच्या या प्रकरणाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आलेली आहे. या कंपनीला दिलेले अनुदान व्याजासह वसूल करण्यात यावे, या पैशाचा वापर करून अन्याय मालमत्ता विकत घेतल्या असतील तर त्याची सक्त वसुली संचालना द्वारे चौकशी करण्यात यावी, मागासवर्गीय घटकांसाठी असलेल्या व्हेंचर कॅपिटल फंड याची वसुली करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आलेली आहे. तसेच याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करून लाटलेले अनुदान वसुल करण्यात येऊन दोषींवर कारवाई न झाल्यास, स्वतंत्र भारत पक्ष, शेतकरी संघटना व वंचित राहिलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. एकूणच यामुळे लोखंडे यांच्या उमेदवारीचा तिढा आणखी वाढणार आहे.
Signed Press Note खासदार लोखंडे कडून पदाचा गैरवापर