Shirdi Loksabha Election | पुणे : शेतकरी योजना आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी नाबार्ड व इतर शासकीय संस्थांकडे असलेल्या योजनांचा निधी आमदार, खासदार आणि राजकारणातील व उद्योग जगतामधील प्रभावशाली व्यक्ती लाटत असल्याच्या तक्रारी आणि चर्चा ही नित्याची बाब आहे. त्यालाच उजेडात आणणारी आणि मोठा भंडाफोड करणारी पत्रकार परिषद आज पुणे शहरात घेण्यात आली. त्यात शिर्डीचे विद्यमान खासदार आणि शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे खासदार अशी ओळख असलेल्या सदाशिव लोखंडे यांच्यावर गंभीर आरोप झालेले आहेत.
Signed Press Note खासदार लोखंडे कडून पदाचा गैरवापर
स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट व नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी पुणे येथील पत्रकार भवनात खासदार लोखंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आता या प्रकरणाची दखल घेऊन त्यांचा राजकीय पक्ष आणि मुख्यमंत्री कोणती कारवाई करणार की उमेदवारी शाबीत ठेऊन पाठराखण करणार याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले आहे की, सामान्य शेतकऱ्यांच्या कंपन्यांना एक आणि आमदार-खासदार पदावर असलेल्या प्रस्थापित व धनदांडग्यांच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना वेगळा न्याय अशा प्रकारचा उलटा कारभार ‘नाबार्ड’द्वारे केला जात असल्याचे दिसते.
डॉ. भारत करडक यांनी “केस स्टडी” म्हणून पत्रकारांसमोर पुराव्यासह बाजू मांडली. त्यांनी म्हटले आहे की, खासदार लोखंडे यांच्या अधिपत्याखालील खेमानंद दूध आणि कृषी प्रोडूसर कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय चेंबूर, मुंबई येथील आहे. या संस्थेचे संचालकपदी त्यांच्या एकाच कुटुंबातील पाचजण संचालक आहेत. पत्नी नंदा सदाशिव लोखंडे, मुलगा प्रशांत सदाशिव लोखंडे, सून प्रियांका प्रशांत लोखंडे, मुलगा राज सदाशिव लोखंडे, सून अश्विनी राज लोखंडे आणि इतर सदस्यपदी कुटुंबातीलच 10 जण आहेत. संचालक पदावर एका कुटुंबातील दोन व्यक्ती असू नयेत असा नियम असतानाही, नियमांना बगल देवून या कंपनीला केंद्र शासनाचे ३२ कोटी पेक्षा जास्त रुपयाचे कर्ज दिले गेले असून, यापैकी १६ कोटी रुपये अनुदान मिळवून दिले आहे. ही एकूण प्रक्रिया बेकायदेशीर आहे.