Shirdi Lok Sabha Election : खासदार पदावर असतानाही केंद्र शासनाच्या एखाद्या योजनत गैरप्रकारांनी व नियमांना बगल देण्यासह सरकारी यंत्रणेवर दबाव आणून स्वतःच्या फायद्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवल्याचे प्रकरण गंभीर आहे. पदाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट आणि नेवासा तालुका शेतकरी उत्पादक कंपनीचे डॉ. भारत करडक यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली होती. त्यानंतर आता थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्र पाठवत या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत अण्णा हजारे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की सन 2018-19 साली केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मिशन ऑपरेशन ग्रीन या योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेमध्ये कांदा, बटाटा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावात घसरण झाल्यास मदत करणे आणि भविष्यात हा नाशवंत शेतमाल लगेच खराब होऊ नये म्हणून कोल्ड स्टोरेज आणि वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणे यांसाठी 500 कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली होती.
Shirdi Lok Sabha Election
त्यानुसार 2020 साली शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन सूना हे संचालक पदावर असलेल्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनी लिमिटेड द्वारे या योजनेसाठी अर्ज केला. या कंपनीचे त्याआधीच्या पाच वर्षात एकही रुपयाची उलाढाल नसताना त्या कंपनीला 32 कोटी रुपयांच्या केंद्रीय योजनेची मंजुरी मिळाली. यापैकी 14.80 कोटी रुपये अनुदान मंजूर झाले. मार्च 2024 अखेर त्यांनी 11.20 कोटी रुपये अनुदान प्राप्त केले आहे.
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अनुदान देण्याचे नियम नाबार्ड, जागतिक बँक, केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी जाहीर केलेले असतात. परंतु या योजनेला हे निकष लागू करण्यात आले नाही ही गंभीर बाब आहे. वित्तीय संस्थांनी कर्ज देताना या नियमांकडे डोळेझाक केल्याचे कळते.
Shirdi Lok Sabha Election
त्यामुळे या सर्व प्रकारात खासदार पदावर असणाऱ्या सदाशिव लोखंडे यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीने संपूर्ण निवड आणि कर्ज मंजुरी प्रक्रियेवर प्रभाव टाकून त्यांच्या कुटुंबातील सदस्य हेच संचालक असणारे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून दिला आहे असे प्रथम दर्शनी लक्षात येते. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल आम्ही राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडे त्यांची खासदारकी रद्द होण्याबाबत विनंती अर्ज केला आहे.
आपणही या प्रकरणामध्ये लक्ष घालून खासदार सदाशिव लोखंडे आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती यांनी केलेल्या पदाच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर यंत्रणांकडे करावी अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.