Shikhar Dhavan : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) साठी भारतीय क्रिकेट संघाची (Team India) सोमवारी घोषणा करण्यात आली. अनुभवी सलामीवीर शिखर धवनला (Shikhar Dhavan) 17 सदस्यीय संघात संधी मिळाले नाही. याआधी विंडीज दौऱ्यावरही धवनचा वनडे संघात समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर त्याला आशिया चषक स्पर्धेत स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती पण, या स्पर्धेसाठी निवड समितीने त्याचा विचार केला नाही.
अशा परिस्थितीत आता धवनसाठी टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांना धवनबद्दल विचारण्यात आले असता, त्यांनी जी उत्तरे दिली त्यावरून आता धवन परतण्याची शक्यता कमी असल्याचे दिसते.
आशिया कप संघाची घोषणा केल्यानंतर अजित आगरकर आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि दोघांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आगरकरला धवनबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांपासून धवन भारतासाठी चमकदार कामगिरी करत आहे. पण सध्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे आमचे आवडते सलामीवीर आहेत.आगरकरच्या या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे की धवनसाठी टीम इंडियात पुनरागमनाचे दरवाजे उघडणे आता आणखी कठीण झाले आहे.
धवन बांगलादेश दौऱ्यापासून संघाबाहेर
३७ वर्षीय शिखर धवनला कसोटी आणि टी-20 मध्ये संधी मिळालेली नाही. तो फक्त एकदिवसीय सामने खेळतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो बांगलादेशविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता, तर तो शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता. बांगलादेश दौऱ्यापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे.
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. धवनने कसोटीत 7 शतकांच्या मदतीने 2315 धावा केल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात 17 शतकांसह 6793 धावा केल्या आहेत. धवनने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 1759 धावा केल्या आहेत.