Sheep Woolen Processing Centre | अहमदनगर: राज्यातील मेंढपाळ समाजाला आर्थिक ऊर्जा देणारा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य (Punyashlok Ahilyadevi Sheli Mendhi Vikas Mahamandal) यांच्या वतीने करंदी (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथे लोकर प्रक्रिया संशोधन केंद्र (Sheep Woolen Processing Centre) उभारले जाणार आहे.
या प्रक्रिया केंद्रासाठी ३ हेक्टर क्षेत्र जमीन देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेले आहे. एकूण महाराष्ट्र राज्यात सुमारे ३० लाख मेंढया असून त्यातील १० टक्के म्हणजे ३ लाख मेंढी संख्येचा वाटा अहमदनगर जिल्ह्याचा आहे. त्यामुळेच याद्वारे राज्यात साध्या तब्बल ९८०० मेट्रिक टन इतकी लोकर उत्पादित होत आहे. यास प्रक्रिया केंद्राची जोड देण्याच्या उद्देशाने ही केंद्र सुरू केले जात आहे.
मेंढीच्या लोकरीद्वारे कपडे, स्वेटर, गालिचे आणि रोजच्या वापरतील वस्तू तयार केल्या जातात. लोकरीची घोंगडी हीसुद्धा पुन्हा एकदा अनेक घरांतून आता पाहायला मिळत आहे. अशाच दर्जेदार वस्तू निर्माण करण्यासाठी ही केंद्र आणखी चालना देण्यास उपयोगी ठरणार आहे. शेतीसमवेत जोडधंदा म्हणून किंवा थेट मेंढी पालन करून हजारो कुटुंब आपली गुजराण करत आहेत. त्या सर्वांना याचा थेट फायदा होणार आहे. करंदी (ता. पारनेर, जि. अहमदनगर | Karadi village, Tal. Parner, Dist. Ahmednagar) येथील शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.