Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतला आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनामा 2 मे रोजी दिला होता त्यानंतर नवीन अध्यक्ष नेमण्यासाठी पक्षात एक समितीची स्थापना करण्यात आली होती मात्र समितीने शरद पवार यांच्या राजीनामा स्वीकार केला नाही.
पवार यांनी स्थापन केलेल्या समितीने शुक्रवारी त्यांचा राजीनामा फेटाळला. यानंतर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली. शरद पवार यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन ‘मी माझा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, या पत्रकार परिषदेला अजित पवार अनुपस्थित राहिले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार फ्रंटफूटवर आले. कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची समजूत घालण्यापासून ते सुप्रिया सुळे यांना बोलण्यापासून रोखण्यापर्यंतची परिस्थिती पवारांनी हाताळली.
तेव्हा त्यांनी आवाहन केले आणि कोणत्याही कार्यकर्त्याने, नेत्याने आग्रह धरू नये, असे सांगून त्यांनी प्रत्येकाने भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले.
शरद पवार यांच्या राजीनाम्याने आता पक्षाची कमान सुप्रिया सुळे की अजित पवार यांच्याकडे जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. दरम्यान, पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे आणि महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवली जाईल, असा युक्तिवादही करण्यात आला.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समितीचा निर्णय आणि कार्यकर्त्यांचा विरोध पाहता अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला.
खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेण्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला रोहित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच पत्रकारांनीही या मुद्द्यावर पवारांना प्रश्न केला.
तेव्हा शरद पवार म्हणाले, “इतर लोक इथे आहेत. समितीने हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयानंतर मी माझा निर्णय मागे घेतला. सर्वजण एकत्र येऊन चर्चा करत आहेत. समितीत ज्येष्ठ नेते आहेत.
शरद पवार यांना अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही लोक नाहीत. मात्र आज सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचवला.
त्या निर्णयाद्वारे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे इथे कोण उपस्थित आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे किंवा त्याचा अर्थ लावणे योग्य नाही.”