Sharad Pawar । महायुती सरकार आणि महाविकास आघाडी सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून आमनेसामने येत असते. अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीत इनकमिंग सुरु झाली आहे. विधानसभेपूर्वी महायुतीतील अनेक राजकीय नेते महाविकास आघाडीमध्ये सहभागी होत आहेत.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाला चांगले यश मिळाले. मोठ्या यशानंतर आता राष्ट्रवादीतील नेते, आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. यावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.
शरद पवार म्हणाले की, “आम्हाला लोकसभेला तुतारी आणि पिपाणी या चिन्हामुळे फटका बसला आहे. आमचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असून आम्ही स्थापन केलेला पक्ष आणि चिन्ह वेगळी भूमिका घेतलेल्या लोकांना दिले आहे. हे सगळे प्रकरण कोर्टात आहे. पुढील आठवड्यात त्याची सुनावणी आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे,” असे शरद पवार यांनी सांगितली.
पुढे शरद पवार म्हणाले की,”माझ्या संपर्कात कोणीही नाही. मी त्याच्यात लक्षही देत नाही. जयंत पाटील यांना ते लोक भेटतात, याची माहिती मला आहे. त्याच्यावर आऊटकम काय येईल हे उद्याचे मतदान झाल्यावर आपल्याला समजेल,” अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.