Sharad Pawar : शरद पवारांनी टाकली गुगली; विधानसभेसाठी त्या मुद्द्यावर आक्रमक होणार पवारांची राष्ट्रवादी

Sharad Pawar : सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर महाविकास आघाडीने देखील आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उमेदवारांची चाचपणी, जागावाटप यासाठी महाविकास आघाडीत खलबतं सुरू झाली आहेत.

राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा पेटत असताना दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीवरूनही राज्याचे राजकीय वातावरण पेटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी नुकतेच एक विधान केले, त्यावरून आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

“राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लोकसभा निवडणुकीत जास्त जागा मिळायला हव्या होत्या. पण महाविकास आघाडीचे ऐक्य टिकावे, यासाठी दोन पावले मागे आलो,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नुकतीच शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची पुण्यातील निसर्ग हॉटेलला बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, जयंत पाटील आणि सर्व नवनिर्वाचित खासदारांनी हजेरी लावली होती.

आपल्या पक्षाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत कुठलीही गडबड होऊ नये, यासाठी लोकसभेला कमी जागांवर समाधान मानले. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगल्या जागा मिळतील, अशी शक्यता शरद पवार यांनी वर्तवली आहे. दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गटाची मोठी ताकद आहे. याचा फायदा पक्षाला आगामी निवडणुकीत होऊ शकतो.

“आपण एकत्रित राहिल्याने लोकसभा निवडणुकीत यश मिळाले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा. आपल्याला राज्य हातात घ्यायचे असल्याने निवडणुकीची तयारी ठेवा. लोकांची जास्तीत जास्ते काम करा,” असे आवाहन शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना केले आहे.

Leave a Comment