Sharad Pawar । ज्येष्ठ नेते शरद पवार हे लोकसभेच्या मोठ्या यशानंतर आता विधानसभेच्या तयारीला लागले आहे. ठिकठिकाणी ते दौरे घेत महायुतीवर निशाणा साधत आहेत. इतकंच नाही तर शरद पवार गटात मोठ्या संख्येने इनकमिंग सुरु झाली आहे. दरम्यान,ते कालपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत.
या दौऱ्यादरम्यान आज शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तसेच विधानसभा निवडणुका, पक्षाच्या रणनिती अशा विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी विधानसभेबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
“मराठा आरक्षणासंबंधी मतभेद असण्याचे कारण नाही. पण दोन वर्गांमध्ये एक प्रकारचे अंतर वाढते की काय याची काळजी आहे. विशेषतः मराठवाड्यातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये याची अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मला वाटते. मला काहींनी सांगितलं की विशिष्ट समाजाच्या हॉटेलमध्ये काही वर्ग जात नाही, हे चिंताजनक असून ते बदलण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर प्रयत्न करावे लागतील,” असं शरद पवार म्हणाले आहेत.
“मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा असा आमचा आणि माझ्या पक्षाचा आग्रह आहे. सर्वांशी सुसंवाद करुन मार्ग काढावा, अशी आमची भूमिका आहे. रस्ता चुकला तर योग्य रस्त्यावर यावे. ज्यांची ज्यांची योग्य रस्त्यावर येण्याची इच्छा आहे त्यांचे स्वागत आहे,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
“राज्यात लवकरच तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. लोकांना बदल हवा आहे. आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, उद्याच्या निवडणुकीत आपल्याला संधी आहे, पण लोकसभेला निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही जे एकसंघ चित्र उभं केलं असून ती प्रक्रिया पुर्ण झाली त्याला मूर्त स्वरुप देण्याची गरज आहे. तसे मुर्तस्वरुप आले तर लोकसभेसारखा निकाल दिसेल नाहीतर राज्यकर्त्यांना किंमत मोजावी लागेल,” असे विधान शरद पवार यांनी केले.